कल्याण – राज्यातील महायुतीचा प्रत्येक खासदार निवडून येण्यासाठी महायुतीचे नेते कामाला लागले आहेत. राज्यातील महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून येणे खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण पूर्व भागात काही तथाकथित गुंंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते आपल्या व्यक्तिगत कारणांसाठी महायुतीचे वातावरण खराब करत असतील ते चुकीचे आहे, असे मत कल्याण लोकसभेतील महायुतीचे दावेदार उमेदवार खासदार डाॅक्टर श्रीकांंत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
कल्याण पूर्व मतदारसंघात भाजप आमदार गणपत गायकवाड समर्थकांंनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबार प्रकरणातून खासदार डाॅ. शिंदे यांचे निवडणुकीत काम न करण्याचा निर्धार केला आहे. तशा आशयचा प्रस्ताव भाजपने प्रदेश भाजप नेत्यांना पाठविल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना खासदार शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात त्यांच्या कार्यकर्त्यांना जे सांगायचे आहे ते सांगितले आहे. त्यामुळे याविषयी अधिक आपण बोलणे योग्य होणार नाही.
हेही वाचा – नाशिकमध्ये महायुतीत अचानक शांतता
विकासाची अनेक कामे आपण कल्याण लोकसभा मतदारसंघात, कल्याण पूर्वेत केली आहेत. केंद्र, राज्य सरकारच्या योजना तळागाळात राबविल्या आहेत. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवित आहोत. अशा परिस्थितीत कोणी व्यक्तिगत कारणातून निवडणूक काळात महायुतीच्या उमदेवाराचा अपप्रचार करत असेल तर ते चुकीचे आहे, असे खासदार शिंदे यांंनी सांगितले.
आमदार गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात स्वताहून महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला आहे. त्यासाठी त्यांना कोणी उद्युक्त केलेले नाही. या गोळीबाराचे भाजपच्या नेत्यांनीही समर्थन केलेले नाही. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. या गोळीबार विषयाचा गैरफायदा घेऊन कोणी महायुतीच्या उमेदवाराचा अपप्रचार करत असेल तर ते सर्वस्वी चुकीचे आहे. आम्ही महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असे म्हणत कोणी गुंड प्रवृत्तीचे लोक त्यात समाधान मानत असतील तर ते योग्य नाही. कल्याण लोकसभेबरोबर राज्यातील महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून यावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यूहरचना आखून आपल्या नेते, पदाधिकाऱ्यांसह प्रचार कार्याला सुरूवात केली आहे. त्यामुळे व्यक्तिगत कारणावरून कल्याण लोकसभा मतदारसंघात अपप्रचार करून कोणीही महायुतीच्या प्रचार कार्यात घोळ घालण्याचा प्रयत्न करू नये, असे खासदार शिंदे यांनी सांंगितले.