विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात शिवसेनेपेक्षाही जास्त जागा भाजपला मिळवून दिल्यामुळे मंत्रिपद मिळण्याची आस लावून बसलेले आमदार संजय केळकर यांना भाजप पक्षनेतृत्वाने ठाणे शहराच्या अध्यक्षपदाची माळ बहाल केल्याने ते नाराज आहेत. मंत्रिपदापासून डावलण्यासाठीच पक्षाने ठाणे शहराचे अध्यक्षपद दिल्याचे लक्षात आल्याने केळकर यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यासच नकार दिला आहे. ठाणे जिल्ह्याच्या संघटकाची जबाबदारी सांभाळल्यानंतर ठाणे शहराचे अध्यक्षपद हे कमी महत्त्वाचे पद असल्याने आपल्याला या पदात रस नसल्याचे त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना कळवल्याचे समजते.
सुमारे १५ वर्षांपूर्वी ठाणे भाजपचे अध्यक्षपद भूषविलेल्या केळकर यांची पुन्हा एकदा शहर अध्यक्षपदी अलीकडेच निवड करण्यात आली. मधल्या काळात केळकर यांनी कोकण पदवीधर (पान २वर) (पान १वरून) मतदारसंघाचे आमदारपद भूषवताना कोकणची संघटनात्मक जबाबदारी हाताळली. ठाणे जिल्ह्यातील भाजपच्या सर्व संघटनांचे प्रमुखपदही त्यांनी भूषवले. असे असताना पक्षनेतृत्वाने ठाणे शहराचे अध्यक्षपद देऊन अन्याय केल्याची केळकर यांची भावना आहे.
राज्यात मंत्रिपद न मिळणे, हेदेखील केळकर यांच्या नाराजीचे कारण मानले जाते. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्य़ात भाजपचे सात तर शिवसेनेचे सहाच आमदार निवडून आले. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मोदी लाटेत भाजपला अधिक यश मिळाले. पण मंत्रिमंडळात भाजपने ठाणे जिल्ह्य़ाला प्रतिनिधीत्व दिलेले नाही. जिल्ह्य़ातून मंत्रिपदाकरिता केळकर यांचे नाव आघाडीवर होते. मुख्यमंत्री ब्राम्हण असल्याने मंत्रिमंडळात ब्राम्हण समाजाच्या किती जणांना संधी द्यायची हा प्रश्न भाजपच्या नेतृत्वासमोर उभा राहिला. यातूनच केळकर यांना पहिल्या विस्तारात संधी मिळाली नाही. आता अध्यक्षपदी नेमून मंत्रिपदापासून त्यांना दूर ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याची भावना त्यांच्या निकटवर्तीयांची झाली आहे.
विधानसभा निवडणुकीतील चांगल्या यशानंतरही ठाण्यात भाजपमध्ये अंतर्गत कलह संपलेला नाही. मिलिंद पाटणकर प्रकरणात ठाणे भाजप किती शिस्तप्रिय हे समोर आले. पक्षाच्या उपमहापौराच्या विरोधात भाजपचेच नगरसेवक उघडपणे विरोधात गेले होते. ठाणे महानगरपालिका निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याकरिता पक्षाकडून सर्वमान्य होईल, अशा नेतृत्वाचा शोध घेण्यात येत होता. यामुळेच केळकर यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ टाकण्यात आली. अर्थात, ठाणे भाजपमध्ये केळकर यांच्या विरोधातही मोठा गट कार्यरत आहे.
नापसंती अध्यक्षांकडे मांडली – केळकर
ठाणे भाजपच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्यावर आपण आपले मत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे मांडले आहे. यापेक्षा महत्त्वाची पदे भूषविली असल्याने ठाणे अध्यक्षपदात आपल्याला रस नाही. आता निर्णय पक्षानेच घ्यायचा आहे, पण आपण पक्षाचे एकनिष्ठ स्वयंसेवक आहोत. यामुळे पक्षादेश अंतिम असेल, असे आमदार संजय केळकर यांनी सांगितले.