आजच्या युगात काही मिळवायचे असेल तर मेहनत आणि नावीन्यपूर्ण गोष्टीचा वेध घेऊन स्वकल्पनेतून काहीतरी वेगळे साकारण्याची इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. कारण याच कल्पकतेतून पुढे स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण होऊन जीवनात यशस्वी होण्याची नवी वाट सापडते. दाक्षिणात्य भागाची ओळख असलेला मसाला डोसा हा जरी सर्वत्र रुळला असला तरी अनेकांच्या न्याहारीचा भाग असलेल्या या डोसासोबत मिळणारा सांबार आणि नारळाची चटणी यांची एक विशिष्ट चव प्रत्येकाच्या जिभेवर असते. परंतु त्या डोसातही काहीतरी वेगळेपण आणि वेगळी चव असावी, या विचारानेच मिरा रोड येथील ‘डोसा हट’ हे ठिकाण देखील स्वत:चा वेगळा ठसा ग्राहकांच्या मनात उमटवत आहे. डोसातील याच नावीन्यांकडे पाहणारे आणि त्यातून काहीतरी वेगळेपण साकारणारे या ‘डोसा हट’चे मालक कमलेश कुमार ठाकूर यांनी स्वकल्पनेतून तब्बल ऐंशी प्रकारचे डोसे तयार केले आहेत.
वेगवेगळे पदार्थ चवीने खायची आणि त्यावर प्रयोग करायची कमलेशकुमार यांना मनापासून हौस आहे. या हौसेखातर चंदेरी दुनियेतील ‘स्पेशल इफेक्टस’चे काम सोडून त्यांनी स्वत:चा खाद्यपदार्थाचा स्टॉल सुरू केला. सुरुवातीला नवी मुंबईत चायनीज पदार्थाचा स्टॉल सुरू केलेल्या ठाकूर यांनी दोनच महिन्यांपूर्वी मिरा रोड येथे ‘डोसा हट’ या हटके नावाने नवी सुरुवात केली आहे. यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेताना मुंबईत वेगवगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डोशांमधील वेगळेपण चाखताना त्यातून नावीन्यपूर्ण असे ८० डोसे तयार करण्याची कला साध्य केली आहे.
नेहमीचा मसाला डोसा हा बटाटा आणि कांद्याचा वापर करून तयार केला जातो. परंतु कमलेश यांनी या पारंपरिक मसाल्यांना फाटा देताना काहीतरी वेगळेपण साकारताना टोमॅटो, भोपळी मिरची, कोबी, बीट, कांदा यांच्यासोबतच पनीर, चीज आणि लोणी यांचा वापर करून वैशिष्टय़पूर्ण असा स्वत:चा मसाला तयार केला आहे. या मसाल्याला डोश्याचे आवरण देऊन तो ग्राहकांना दिला जातो किंवा डोश्यासोबत स्वतंत्रपणेही दिला जातो. याशिवाय ग्राहकांच्या आवडीनुसार त्याची चव चटपटीत अथवा गोड देखील केली जाते. एरवी डोश्यासोबत नारळाची चटणी दिली जाते. मात्र ‘डोसा हट’मध्ये कमलेशकुमार यांनी नारळाच्या पारंपरिक चटणी सोबतच स्वत: शोधून काढलेली वेगळ्या चवींची चटणीदेखील ग्राहकांना लज्जतदार डोश्यांची वेगळीच अनुभूती देत आहे.
डोसा आणि चायनीजचा अनोखा मेळ
डोसा आणि चायनीज यांचा अनोखा मेळ घालत चायनीज पदार्थाची चव देणारे डोसेदेखील याठिकाणी मिळतात. दिलखूश डोसा, जीनी डोसा, ओपन जीनी डोसा, चॉप्सी मंचुरीयन डोसा, चीज चॉप्सी मैसुर मसाला डोसा, पनीर चिली डोसा, चीज चिली डोसा, शेजवान चॉप्सी डोसा असे डोश्याचे नानाविध प्रकार चाखण्याची संधी या ‘डोसा हट’मध्ये उपलब्ध आहे. या डोशांच्या मसाल्यात भाज्यांसोबत शेजवान सॉसचाही वापर केला जातो. अनेकांना डोसा कुरकुरीत खायला आवडतो. म्हणून डोश्याचा कुरकुरीतपणा जपण्यासाठी आणि त्याला विशिष्ट प्रकारचा रंग यावा, यासाठीही कमलेश यांनी आपल्या पद्धतीने त्यात खास संशोधन केले आहे.
सजावट आणि स्वच्छतेवर विशेष लक्ष
कोणताही पदार्थ कसा सजवला आहे यावरून त्याची लज्जत आणखीन वाढत असते. हल्ली खवय्यांना चीज खायची अधिक आवड असते, यासाठी कमलेशकुमार यांनी आपल्या प्रत्येक डोशाला चीजने विशेष सजावट केली जाते. प्रत्येक डोशाची चव कायम राहावी, यासाठी विशेष प्रयत्न करताना या ‘डोसा हट’मध्ये स्वच्छता आणि टापटीपपणा राखण्यासाठीही विशेष प्रयत्न केले जातात. डोश्यांबरोबरच या हटमध्ये सॅँडवीचचे ३० प्रकार, पिझ्झा, बर्गरदेखील या उपलब्ध आहेत. याशिवाय घरबसल्या त्यांचा आस्वाद घ्यायचा असेल तर तशी सुविधाही या ठिकाणी आहे.
- ठिकाण- पत्ता – शॉप क्र – २, आकाश गंगा, एमटीएनएल रोड, शांती पार्क, मिरा रोड (पूर्व)
- संपर्क – ७९००१३३५५८
- वेळ – दुपारी ३ ते रात्रौ ११