चिखलोली धरणाच्या विस्तारीकरणाची योजना मार्गी; येत्या वर्षभरात काम सुरू होणार

अंबरनाथ शहरातील चिखलोली धरणाच्या विस्तारीकरणाची योजना मार्गी लागली असून त्याअंतर्गत शहरवासीयांना सध्यापेक्षा दुप्पट पाणीपुरवठा होऊ शकणार आहे. यामुळे शहराच्या पूर्व भागात असलेली पाणीटंचाईची समस्या सुटण्यास मदत होईल. सध्या बारवी धरणातून प्रतिदिन सहा दशलक्ष लिटर्स पाणी मिळते. विस्तारीकरणानंतर सुमारे १२ दशलक्ष लिटर्स म्हणजेच जवळपास दुप्पट पाणीपुरवठा होऊ शकेल, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता उमेश पवार यांनी दिली.

सध्या अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांची लोकसंख्या झपाटय़ाने वाढू लागली आहे. नवनवीन गृहसंकुले उभी राहात आहेत. त्यामुळे दोन्ही शहरांची पाण्याची गरजही वाढू लागली आहे. या पाश्र्वभूमीवर अंबरनाथला अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यासाठी चिखलोली धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव होता. चिखलोली धरणाच्या पलीकडे कोणतेही गाव नाही. त्यामुळे शासनाने धरणाची उंची अडीच मीटरने वाढवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ०.८० दशलक्ष घनमीटर अतिरिक्त पाणी अंबरनाथकरांना उपलब्ध होईल.  मंत्रालयात नुकत्याच झालेल्या एका बैठकीत चिखलोली धरण विस्तारीकरण योजनेस मंजुरी देण्यात आली. पुढील वर्षी जानेवारी ते मे अशा पाच महिन्यांच्या काळात धरणाची उंची वाढविण्याचे काम केले जाईल. त्याआधी पाणीसाठा काढून धरण रिकामे करावे लागेल. त्यामुळे अंबरनाथ पूर्व विभागाला बॅरेज वा बारवीतून पाणीपुरवठा करावा लागणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

‘जावसई’ धरणालाही जीर्णोद्धाराची प्रतीक्षा

अंबरनाथ शहराच्या पूर्वसीमेवरील चिखलोलीप्रमाणेच पश्चिम विभागात केंद्र शासनाच्या आयुध निर्माणी कारखान्याच्या मागे आणखी एक धरण आहे. गेली अनेक वर्षे हा जलसाठा दुर्लक्षित अवस्थेत वापराविना आहे. उंचावर असणाऱ्या या धरणातून गुरुत्वीय पद्धतीने जावसईकरांना पाणीपुरवठा करणे शक्य आहे. या  धरणाचीही उंची वाढविणे शक्य असून त्यामुळे तिथे आता आहे, त्यापेक्षा अधिक जलसाठा होऊ शकेल. या धरणाच्या जीर्णोद्धाराचीही मागणी आता पुढे येऊ लागली आहे.

Story img Loader