डॉ. अरुणा ढेरे यांचे मत; ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे सत्कार
मराठी साहित्य संमेलन हा महोत्सव आहे. या माध्यमातून वाङ्मय व्यवहाराविषयीचे उपक्रम सुरू व्हायला हवेत. त्याला वेगवेगळ्या पिढय़ांची तसेच नव्या वाचकांची साथ मिळायला हवी. या महोत्सवातून वाचन संस्कृती वाढायला हवी; जेणेकरून तरुण अभ्यासक निर्माण होतील. राज्याच्या सांस्कृतिक समृद्धीसाठी अशा अभ्यासकांची आवश्यकता आहे, असे मत मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा, ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी येथे व्यक्त केले.
मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे नियोजित अध्यक्षांच्या सत्काराचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतो. डॉ. ढेरे यांनी या सत्कारानिमित्त केलेल्या भाषणात वरील मत व्यक्त केले. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही माझ्या दृष्टीने एक मोठी जबाबदारी आहे. या पदासाठी ज्यावेळी मला विचारण्यात आले त्यावेळी मी नकार दिला होता. याचे कारण म्हणजे हे पद फार उंचीचे आहे आणि ही उंची अनेक मोठय़ा ज्ञानवंतांनी वाढवलेली आहे. नामवंतांनी या पदाला जी प्रतिष्ठा दिलेली आहे त्या प्रतिष्ठेला साजेसे काम आपल्या हातून व्हावे, ही अट संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आपण मनाशी बाळगली पाहिजे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
पुण्यातील आमच्या घरात सतत थोर माणसे यायची. इंदिराबाई, पद्माताई, कुसुमाग्रज घरी यायचे. या विद्वानांच्या जोडीला विविध पुस्तकेही घरभर पसरलेली असायची. घरात येणारी माणसे आणि घरातली पुस्तके हीच आमच्या घरची खरी श्रीमंती होती. माणूस वाढताना त्याच्याभोवती असणारे वातावरण हे खूप महत्त्वाचे आहे. जग हे बदलले आहे. मात्र आजही पुस्तक वाचन होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.