कल्याणः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास, त्यांचे साहित्य, त्यांची आंदोलने आणि विचार होलोग्राफीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनुभवण्याची संधी कल्याणकरांना मिळणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ड प्रभाग कार्यालयाशेजारी उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील ज्ञान केंद्राचे लोकार्पण येत्या १३ एप्रिल रोजी होते आहे. या ज्ञान केंद्रात शेकडो पुस्तके असलेले ग्रंथालय, चित्र, दृकश्राव्य (डिजीटल) रूपाने मांडण्यात आलेला डॉ. बाबासाहेबांचा जीवनप्रवास अनुभवता येणार आहे. हे देशातील एकमेव असे अत्याधुनिक ज्ञान केंद्र ठरणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे.

कल्याण पूर्वेतील ड प्रभाग क्षेत्र परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या उभारणीचा शुभारंभ १२ एप्रिल २०२२ रोजी झाला होता. तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचे भूमीपूजन संपन्न झाले होते. या स्मारकाच्या उभारणीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार होता. १० मार्च २०२४ रोजी या स्मारकातील पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. मात्र यातील ज्ञान केंद्राचे काम पूर्ण झाले नव्हते. अखेर आता या ज्ञान केंद्राचे काम पूर्ण झाले असून येत्या १३ एप्रिल रोजी या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण केले जाणार आहे. हे केंद्र राज्यातील एक आगळवेगळे केंद्र ठरणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्रात प्रामुख्याने तीन गोष्टींचा समावेश आहे.

कसे आहे ज्ञान केंद्र

कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील ज्ञान केंद्रात प्रामुख्याने ग्रंथालय, होलोग्राफी दालन आणि डॉ. आंबेडकरांचा जीवनप्रवास दाखवलेले दालन आहे. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन प्रवास, ज्यात त्यांचे शिक्षण, जीवनातील महत्वाचे टप्पे, त्यांचे विवाह, आंदोलने, राजकीय भूमिका अशा विविध विषयांची माहिती देण्यात आली आहे. यात काही स्मार्ट स्क्रीनही बसवण्यात आल्या आहेत. नाशिकच्या काळाराम मंदिरातील प्रवेश ही घटना दाखवण्यासाठी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. तर महाडच्या चवदार तळ्याचीही प्रतिकृती साकारली आहे. यात दालनातून फिरताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण जीवनपट आपल्यासमोर उभा राहतो.

परस्पर संवादी होलोग्राफी दालन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या कार्यालयात बसून थेट संवाद साधत असल्याचा अनुभव या ज्ञान केंद्रातील होलोग्राफी दालनात अनुभवता येणार आहे. आपले विचार, तत्वज्ञान थेट डॉ. आंबेडकर सांगत असल्याचे यात दाखवले जाते. हा राज्यातील पहिलावाहिला प्रयोग असल्याचा दावा केला जातो आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहिष्कृत समाजासाठी केलेल्या कामांचा आढावा प्रोजेक्टर आणि पॅनलच्या माध्यमातून दाखविला जाणार आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र हे देशातील एकमेव केंद्र आहे. मुंबई किंवा भारतात असे केंद्र कुठेही नाही. हे केवळ माहिती देणारे केंद्र नसून हे संवाद साधणारे केंद्र आहे. इथे मोठ्या डिजीटल स्क्रीन्स बसवण्यात आल्या आहेत. येथे कियॉस्कवर क्लिक करून तुम्ही नव-नव्या गोष्टी जाणून घेऊ शकता. येणाऱ्या पिढ्यांना बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची सर्व माहिती इथे प्रत्यक्ष उपलब्ध आहे. तसेच, इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यावर संशोधन देखील करता येणार आहे. – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण लोकसभा

स्मारकाचा आव्हानात्मक प्रवास

या स्मारकासाठी ड प्रभाग समितीच्या परिसरात जागा होती. मात्र त्यावर प्रभाग समितीचे आरक्षण होते. त्यामुळे हे आरक्षण बदलण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. ३ नोव्हेंबर २०२१ रोजी या जागेवरील १३०० चौरस मीटर क्षेत्राचे आरक्षण क्रमांक ४२३ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी बदलण्यात आले. तसेच १३ कोटी ७४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर १२ एप्रिल २०२२ रोजी या कामाचे भूमीपूजन तर १० मार्च २०२४ रोजी यातील पुतळ्याचे अनावरण झाले.