ठाणे: अस्पृश्यता निर्मूलन करण्यासाठी आपले आयुष्य वेचलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवन काळात अनेक घटना प्रसंगांना सामोरे जात अस्पृश्यतेला मूठमाती देण्याचा प्रयत्न केला. अशाच एका सामोपचाराच्या प्रसंगात डॉ. आंबेडकर यांनी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी ज्या खुर्चीवर बसून वाद मिटवला होता. ती खुर्ची येथील भराडे कुटुंबीयांनी अजूनही जपून ठेवली आहे. लेखक आणि इतिहास संशोधक योगेंद्र बांगर यांच्या संशोधनात ही बाब नुकतीच समोर आली. या निमित्ताने ठाणे जिल्ह्यातील डॉ. आंबेडकरांच्या आठवणी टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भिमाबाई यांचे वडील मेजर धर्मा सुभेदार आणि त्यांचे सहा भाऊ हे सहाव्या फलटणीत सुभेदार होते. धर्मा सुभेदार यांना चार मुले व दोन मुली होत्या. त्यापैकी धाकटी मुलगी भीमाबाई या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या माता होय. त्यांचे माहेरचे आडनाव मुरबाडकर पंडित होते. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा हा देदीप्यमान इतिहास मुरबाड तालुक्याला लाभला आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मे १९४१ रोजी सकाळी नऊ वाजून ४५ मिनिटांनी मुरबाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे राहणारे अनंत धोंडू भराडे यांच्या कुटुंबीयांच्या घरी भेट दिली होती. तेव्हा गोविंद बाळू थोरात यांच्याही अंगणात ते आले होते. भाऊराव कृष्णराव तथा दादासाहेब गायकवाड हे देखील त्यांच्या समवेत उपस्थित होते.
हेही वाचा… मीरा भाईंदर शहरात १८३ बांधकामे अनधिकृत, प्रशासनाकडून पहिल्यांदाच यादी प्रसिद्ध
दिनांक १९ मे १९४१ रोजी गावाच्या मध्यभागी असलेली फौजदारांची किंवा गायकरांची विहीर असलेल्या जागेत पाणी भरण्यावरून वाद झाला होता. हा वाद विकोपास जाऊ नये म्हणून स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुरबाडला येऊन सामोपचाराने हा वाद मिटवला. हा संपूर्ण इतिहास माता भिमाई पुस्तकाचे लेखक, इतिहास संशोधक योगेंद्र बांगर यांनी त्यांच्या मुरबाड इतिहास व संदर्भ या ग्रंथात संकलित केला आहे. ज्या खुर्चीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर बसले होते. ती ऐतिहासिक खुर्ची आजही कौशिक अनंत भराडे आणि भराडे कुटुंबीय यांनी स्मृती रुपाने जतन केली आहे. महामानवाच्या मुरबाड मधील आगमनाच्या आठवणीही लाकडी खुर्ची जागवत आहे. या सर्व आठवणींचा संग्रह आणि जपून ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे बांगर यांनी व्यक्त केली आहे.
प्रतिक्रिया: डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या हयातीत ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी गेले होते. मुरबाड येथे त्यांच्या अशा अनेक आठवणी आहेत. संशोधनाच्या माध्यमातून त्या समोर येत आहेत. – योगेंद्र बांगर, इतिहास संशोधक आणि लेखक, मुरबाड.