ठाणे : महापालिका मुख्य वैद्यकीय अधिकारी पदावर डॉ. चेतना नितील के यांची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे. त्या सोमवारी पदभार स्विकारणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याने गेल्या दोन महिन्यांपासून हे पद रिक्त होते. ठाणे महापालिकेचे तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. टी. केंद्रे हे पाच वर्षांपूर्वी सेवानिवृत्ती झाले. तेव्हापासून या पदावर आतापर्यंत सहा ते सात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कचऱ्यातील टाकाऊ वस्तुंचा पुनर्वापर करण्यासाठी कडोंमपात १० संकलन केंद्रे

यामध्ये पालिका सेवेतील आणि राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश होता. हे सर्व जण या पदावर फार काळ काम करू शकलेले नाहीत. यातील काहींनी स्वतःहून पदभार सोडला. तर डॉ. राजीव मुरुडकर यांना लाचखोरीमुळे पदभार सोडावा लागला. तसेच रुग्णालयातील डॉक्टरांच्या वसतीगृहाच्या दुरावस्थेस जबाबदार धरून महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी तसेच कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठता डॉ. योगेश शर्मा आणि उप अधिष्ठाता डॉ. सुचितकुमार कामखेडकर यांना दोन महिन्यांपूर्वी निलंबित करण्यात आले. मुख्य आरोग्य अधिकारी या पदाचा प्रभारी पदभार डॉ. राकेश बारोट यांच्याकडे देण्यात आला होता. असे असतानाच, या पदावर आता राज्य सरकारने मुंबई महापालिकेतील वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतना नितील के यांची नियुक्ती केली आहे. १ वर्षाच्या कालावधीसाठी त्यांची प्रतिनियुक्त करण्यात आली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr chetna nitil k appointed as thane municipal chief medical officer zws