नाटय़गृहाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या वर्षभरापासून दुरुस्तीच्या कारणास्तव बंद असलेल्या डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहातील मिनी थिएटरच्या (लघू प्रेक्षागृह) दुरुस्तीचे काम अखेर पूर्ण झाले असून दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजेच ८ ऑक्टोबरला हे थिएटर पुन्हा कार्यक्रमांसाठी खुले करण्यात येणार आहे.

घोडबंदरवासीयांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी महापालिका प्रशासनाने त्या ठिकाणी डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृह उभारले आहे. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हे नाटय़गृह दुरुस्तीच्या कारणास्तव वारंवार बंद ठेवण्यात येत होते. याबद्दल नाराजी व्यक्त होत असतानाच गेल्या वर्षभरापासून नाटय़गृहाचे लघू प्रेक्षागृहदेखील बंद करण्यात आले.

व्यावसायिक तसेच प्रायोगिक रंगकर्मी या मिनी थिएटरचा तालमीसाठी वापर करतात. शाळा, महाविद्यालये तसेच सामाजिक संस्थांचे कार्यक्रमही या ठिकाणी होतात. या थिएटरचा खर्च आर्थिकदृष्टय़ा परवडत असल्यामुळेच अनेक संस्थांकडून त्याला पसंती दिली जाते. मात्र गेल्या वर्षी बंद करण्यात आलेले हे प्रेक्षागृह अद्याप सुरू करण्यात आले नव्हते. या संदर्भात रसिक प्रेक्षकांनी केलेल्या तक्रारीनंतर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी प्रेक्षागृहाची पाहणी करून दुरुस्तीकामांचा आढावा घेतला. त्या वेळी दुरुस्तीची ८० टक्के कामे पूर्ण झाल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यामुळे एका महिन्यात ही कामे पूर्ण करून थिएटर नाटय़प्रेमींसाठी खुले करण्याचे

आदेश महापौर शिंदे यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार आता हे दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून पाडव्याच्या मुहूर्तावर हे प्रेक्षागृह खुले करण्यात येईल.

‘येत्या ८ ऑक्टोबरला सायंकाळी थिएटरचा उद्घाटन कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे ठरवून दिलेल्या वेळेतच हे थिएटर नाटय़प्रेमींसाठी खुले करून देत आहोत,’ असे महापालिकेचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr kashinath ghanekar theater repair work complete