१४ व्या ‘बासरी उत्सव’मध्ये शास्त्रीय संगीत गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्कार’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रविवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडलेल्या या सोहळ्यास शास्त्रीय संगीत, तसेच इतर क्षेत्रातील कलाकार उपस्थित होते.
ख्यातनाम बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य विवेक सोनार यांनी स्थापन केलेल्या गुरुकुल प्रतिष्ठान या धर्मादायी संस्थेतर्फे ‘बासरी उत्सव’चे आयोजन दरवर्षी केले जाते. २०१२ पासून या महोत्सवादरम्यान संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्कार’ देवून केला जातो. आतापर्यंत हा पुरस्कार उस्ताद अमजद आली खान, किशोरी आमोणकर, पंडित शिवकुमार शर्मा आदी मान्यवरांना देण्यात आला आहे.
हेही वाच – डोंबिवलीत फडके रस्त्यावर रोटरी क्लबतर्फे आनंदोत्सव
कोणत्याही कलाकाराला साधनेच्या वाटेवर चालावे लागते. श्रोत्यांची दाद आणि आपले प्रेम सर्वात मोठे असते. आजचा पुरस्कार हा माझ्या साधनेला मिळालेली सुरेल दाद आहे, असे यावेळी डॉ. प्रभा अत्रे म्हणाल्या. तर, एका तपस्वीच्या नावाने दुसऱ्या तपस्वीला मिळालेला हा पुरस्कार आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की, तुम्ही वयाने कितीही मोठे झाले तरी मनानेही तरुण असायला पाहिजे. आज पंडित हरिप्रसाद चौरसियाजी ८४ वर्षांचे आहेत, प्रभाताई ९० वर्षांच्या आहेत, पण या दोघांचे बासरीचे सूर आणि गायन ऐकताना वयाची जाणीव होत नाही. धकाधकीच्या जीवनात आपण कितीही थकलो असलो, ताण-तणावाखाली असलो तरी या कलावंतांची अदाकारी सर्व क्षीण दूर करायला भाग पाडतात. हे कलाकार आपले जगणे सुंदर करून टाकतात. त्यामुळे त्यांच्या उपकरातून उतराई होणे कदापि शक्य नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा – …म्हणून शिवसैनिकाने मुलीचे नाव ‘शिवसेना’ ठेवले, डोंबिवलीतील प्रकार
यावेळी नुकतीच वयाची नव्वदी पार केलेल्या डॉ. अत्रे यांच्या गौरवार्थ बासरीवादक विवेक सोनार यांनी इतर ९० बासरी कलाकारांबरोबर ‘फ्लूट सिम्फनी’ सादर केली. बासरी वादकांनी आपल्या बासरी उंचावून डॉ. अत्रे यांना मानवंदना दिली. उत्सवाची सांगता रविवारी शशांक सुब्रमण्यम आणि पंडित राजेंद्र प्रसन्ना यांच्या बासरी वादनाने झाली.