डॉ. प्रदीप उप्पल, डॉ. राकेश कटना,
माउथ कॅन्सर फाउंडेशन, ठाणे
आरोग्य विभागाने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील सुमारे ३० टक्के जणांना तंबाखू सेवनाचे व्यसन आहे. त्यात सिगरेट किंवा बिडी पिणाऱ्यांची संख्या २५ टक्के आहे. गुटखा अथवा पानाद्वारे तंबाखू खाणाऱ्यांचे प्रमाण ३२ टक्के आहे. बहुतेकांना साधारणपणे १५ ते १६ व्या वर्षी तंबाखूचे व्यसन लागते. भारतात दरवर्षी तंबाखूमुळे कर्करोग होऊन दीड लाखाहून अधिकजण मृत्युमुखी पडतात. कर्करोग होऊन मरण पावणाऱ्या दर पाच जणांपैकी तिघांना तंबाखूच्या व्यसनामुळे या रोगाची बाधा होते. पुन्हा तंबाखूमुळे केवळ कर्करोगच होतो, असे नाही. ४२ लाख लोकांना तंबाखूमध्ये हृदयरोग तर ३७ लाख जणांना श्वसनाचे आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जीवघेण्या आजारांना निमंत्रण देणारे हे व्यसन शालेय वयात लागण्याचा सर्वात मोठा धोका असतो. त्यामुळे ठाण्यातील कान-नाक-घसातज्ज्ञ डॉ. प्रदीप उप्पल आणि कॅन्सर शल्यचिकित्सक डॉ. राकेश कटना यांनी ‘माउथ कॅन्सर फाउंडेशन’ची स्थापना करून शालेय स्तरावर तंबाखू विरोधी अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे महापालिका प्रशासनाच्या सहकार्याने हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमात आतापर्यंत याविषयी जनजागृती करणारे दोन कार्यक्रम झाले. त्यात शहरातील विविध शाळांच्या मुख्याध्यापकांना याविषयी माहिती देण्यात आली. आता शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश पोहोचविला जाणार आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद..
* शासनाचा आरोग्य विभाग सातत्याने तंबाखूविरोधी अभियान राबवीत आहे, मग पुन्हा स्वतंत्रपणे शहरात हाच विचार का मांडावासा वाटला?
प्रत्येक तंबाखूजन्य वस्तूवर ती आरोग्यास धोकादायक असल्याचे नमूद केलेले असते. मात्र त्या सूचनेकडे दुर्लक्ष केले जाते. तो इशारा लोकांनी गांर्भीयाने घेतला असता तर भारतात दररोज पाच हजार जणांना नव्याने तंबाखूचे व्यसन जडले नसते. त्यामुळे तंबाखूपासून नागरिकांनी दूर रहावे, हा संदेश देण्यासाठी आम्ही ठाणे महापालिका क्षेत्रात अभियान राबविण्याचा निर्णय घेतला.
* अभियानात शालेय मुलांना लक्ष्य करण्याचे कारण काय?
आमच्याकडे येणाऱ्या अनेक रुग्णांशी चर्चा केल्यानंतर लक्षात आले की बहुतेकांना ते शाळेत असल्यापासून तंबाखू खाण्याची, सिगरेट ओढण्याची सवय लागलेली असते. गंमत किंवा मोठय़ा वर्गातल्या मुलांचे अनुकरण म्हणून मुले तंबाखूच्या नादी लागतात. त्यामुळे शाळेतच याविषयी जनजागृती केली तर नव्याने या व्यसनाच्या आहारी जाणाऱ्यांचे प्रमाण निश्चितच कमी होऊ शकेल. गोव्यात अलीकडेच अशा प्रकारचे अभियान राबविण्यात आले. त्याचे खूप चांगले परिणाम दिसून आले. त्यामुळे त्याच धर्तीवर आम्ही ठाण्यात तंबाखूमुक्त अभियान सुरू केले.
* या अभियानाची सुरुवात कशी झाली?
सर्वात आधी ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आम्ही एक जनजागृतीपर कार्यक्रम केला. त्यात तंबाखूचे धोके सांगितले. उपस्थितांना हा कार्यक्रम खूपच आवडला. तेव्हा हे तंबाखूविरोधी अभियान शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत नेण्याचा निर्णय घेतला. महापालिका प्रशासनानेही या कामी फाउंडेशनसोबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. गेल्या जानेवारी महिन्यात डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात ठाणे परिसरातील शाळांच्या मुख्याध्यापकांना बोलावले होते. त्या कार्यक्रमात २५० मुख्याध्यापक उपस्थित होते. त्यांना अभियानाची गरज आणि स्वरूप समाजावून सांगितले. त्यांनी या कामी सहकार्य करण्याची तयारी दाखवली. त्यानुसार आता शाळा-शाळांमध्ये हा विचार आम्ही नेणार आहोत.
* या अभियानाचे स्वरूप कसे असेल?
फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही आता प्रशिक्षित कार्यकर्ते तयार करीत आहोत. ते कार्यकर्ते शाळा-शाळांमध्ये जाऊन आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांना तंबाखूचे दुष्परिणाम समजावून सांगतील. त्यासाठी सचित्र फलक, कोष्टक तयार करण्यात आली आहेत. दृक्श्राव्य माध्यमातून या विषयाचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिले जाईल. तंबाखूमुळे कर्करोग झालेल्या काही रुग्णांचे अनुभवही मुलांना ऐकविण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारे त्यांनी तंबाखूच्या वाटय़ास जाऊ नये. यासंदर्भात शहरात ठिकठिकाणी लावण्यासाठी दोन हजार फलक तयार करण्यात आले आहेत. या विषयावर आंतरशालेय चित्रकला, निबंध स्पर्धा घेतली जाईल. त्यातील निवडक चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येईल. अशा पद्धतीने शहरातील प्रत्येकापर्यंत हा विचार नेण्याचा प्रयत्न आम्ही करू. अर्थात हे काही महिन्यात, एका वर्षांत होणार नाही. नियमितपणे, सातत्याने अशा प्रकारचे उपक्रम राबवावे लागणार आहेत. त्यामुळेच फाउंडेशनला स्वयंसेवकांची, कार्यकर्त्यांची मदत लागणार आहे.
* तंबाखूमुळे कर्करोगाव्यतिरिक्त अन्य कोणते विकार होतात?
कर्करोगाव्यतिरिक्त नियमित तंबाखू सेवन करणाऱ्यांना रक्तदाब, हृदयरोग तसेच अर्धागवायूचा त्रास होतो. तंबाखू सेवनामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. दमा तसेच अन्य श्वसनाचे आजार जडतात. तंबाखू खाऊन कुठेही थुंकण्याच्या सवयीमुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येते.
* तंबाखूचे इतके घातक परिणाम असताना शासन त्यावर बंदी का घालत नाही?
या प्रश्नाचे उत्तर आम्ही देऊ शकत नाही. तो आमचा विषय नाही. वैद्यकीय व्यावसायिक म्हणून कार्यरत असताना आम्हाला याविषयाचे गांभीर्य कळले. आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांना आम्ही याविषयी सावध करतोच, पण आता सामाजिक जबाबदारी म्हणून याविषयी जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. बंदी असो वा नसो, फुकट मिळो वा विकत- मुलांनो तंबाखूपासून दूर राहा, असा संदेश आम्ही या अभियानाद्वारे देत आहोत.
प्रशांत मोर