डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानात कोकण महोत्सव भरविण्यास नागरिकांचा कठोर विरोध असल्याची गंभीर दखल ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी घेतली. नागरिकांच्या मागणीवरुन खा. शिंदे यांनी पालिका प्रशासनाला तातडीने प्रस्तावित कोकण महोत्सवाची परवानगी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती खासदार डॉ. शिंदे यांचे स्वीय साहाय्यक अभिजीत दरेकर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. परवानगी रद्द झाल्याचे कळताच नागरिक, खेळाडू आणि मनसेतर्फे प्रल्हाद म्हात्रे यांनी खा. डॉ. शिंदे यांना धन्यवाद देत समाधान व्यक्त केले आहे.
हेही वाचा >>> डोंबिवलीतील भागशाळा मैदानातील कोकण महोत्सवाला क्रीडाप्रेमींचा विरोध
डोंबिवली पश्चिमेत भागशाळा मैदान हे शहराच्या मध्यवर्ति ठिकाणचे प्रशस्त सर्व सुविधायुक्त खेळ मैदान आहे. हे मैदान फक्त मैदान म्हणून पालिकेने राखून ठेवावे. याठिकाणी कोणत्याही उत्सवी कार्यक्रमाला पालिकेने परवानगी देऊ नये, अशी मागणी मागील पाच वर्षापासून शहरातील खेळाडू, ज्येष्ठ नागरिक, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद म्हात्रे यांच्याकडून केली जात आहे.
नागरिकांच्या मागणीला न जुमानता हे कार्यक्रम होत असल्याने नागरिकांमध्ये पालिकेविषयी तीव्र रोष निर्माण झाला होता. यावेळी कोणत्याही परिस्थितीत भागशाळा मैदानात होणाऱ्या महोत्सवाला कडाडून विरोध करायचा असा निर्धार भागशाळा मैदानात अनेक वर्ष क्रिकेट खेळणाऱ्या माॅर्निंग क्रिकेट क्लबचे सदस्य, फूटबाॅलपटू, अनेक विद्यार्थ्यांचे पालक यांनी केला होता. महोत्सव सुरू झाला तर काळ्या फिती लावून साखळी उपोषण सुरू करण्याच्या हालचाली नागरिकांनी सुरू केल्या होत्या. त्यात मैदानात महोत्सवाचे सामान येऊन पडण्यास सुरुवात होताच खेळाडूंमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.
खासदारांना संपर्क
मैदानात नियमित येणाऱ्या काही जाणकार नागरिकांनी थेट खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांना संपर्क करुन कोणत्याही परिस्थितीत भागशाळा मैदानात कोणत्याही उत्सवाला परवानगी देऊ नये यासाठी पालिका आयुक्तांना सूचित करण्याची मागणी केली होती. ‘मैदान हे मैदान म्हणूनच राहिले पाहिजे. खेळाडू, ज्येष्ठ नागरिकांना खेळणे, फिरण्यासाठी ही हक्काची जागा असते. नागरिकांच्या अधिकारावर गदा येता कामा नये. उत्सवी कार्यक्रमांना पालिकेने अन्य मैदानावर परवानगी द्यावी. डोंबिवली पश्चिमेत भागाशाळा हे एकमेव प्रशस्त मैदान आहे. या मैदानावर पालिकेने एका महोत्सावाला दिलेली परवानगी रद्द करावी म्हणून आपण आयुक्तांना सांगतो, असे खा. शिंदे यांनी संपर्क करणाऱ्या डोंबिवलीतील नागरिकांना आश्वस्त केले. खा. शिंदे यांनी मंगळवारी पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांना संपर्क केला. त्यांना भागशाळा मैदानावरील प्रस्तावित महोत्सवाची परवानगी रद्द करण्यास सांगितले, प्रशासनाने या सूचनेची तातडीने दखल घेतली आहे.
हेही वाचा >>> आमदारांच्या सुरक्षेत वाढ केल्यावरुन भाजपा आमदाराचा शिंदे सरकारला घरचा आहेर
आयुक्तांकडून दखल
निवृत्त महाव्यवस्थापक सी. डी. प्रधान यांनी काल पासून आयुक्तांना भागशाळा मैदानातील परवानगी रद्द करावी म्हणून तगादा लावला होता. मंगळवारी सकाळी प्रधान यांनी आयुक्त दांगडे यांच्याशी संपर्क करुन भागशाळा मैदानात होणाऱ्या महोत्सवामुळे नागरिक, खेळाडू, विद्यार्थी, पालकांच्या भावना कशा तीव्र आहेत याची माहिती दिली. आयुक्त दांगडे यांनी याविषयी आपण गांभीर्याने विचार करत असल्याचे प्रधान यांना सांगितले होते. भागशाळा मैदान पालिकेच्या अखत्यारित असले तरी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी डोंबिवली विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद म्हात्रे दर आठवड्याला मैदानातील मातीचा समतलपणा, पाण्याची फवारणी याविषयी काळजी घेतात. त्यांनी अनेक सुविधा मैदानात दिल्या आहेत. महोत्सव काळात या सर्व सुविधांची वाताहत होत असल्याने प्रल्हाद म्हात्रे महोत्सव आयोजना वरुन नाराज होते.
“ लोकभावनेचा विचार करुन भागशाळा मैदानावरील महोत्सवाची परवानगी रद्द करावी असे पालिका आयुक्तांना कळविले आहे. मैदानाचा वापर मैदान म्हणून होईल याची काळजी घेण्याची सूचना केली आहे.”
– डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार
” भागशाळा मैदान डोंबिवली पश्चिमेतील प्रशस्त सर्व सुविधांनी युक्त मैदान आहे. मैदान म्हणून या ठिकाणचे पावित्र्य आम्ही राखतो. त्याचा लाभ नागरिक घेतात. अशा मैदानावर उत्सव होत असेल तर नागरिकांच्या अधिकारावर गदा येते. लोकभावनेचा आदर करुन अतिव्यस्ततेमध्ये खा. शिंदे यांनी मैदानावर होणाऱ्या महोत्सवाची परवानगी रद्द करण्याचे महत्वाचे काम केले. याविषयी नागरिक, खेळाडू, व्यक्तिश आपण त्यांचे कौतुक करतो.”
– प्रल्हाद म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते