अंबरनाथ : ‘राज्यात ऑपरेशन टायगर सुरूच राहणार आहे. त्याचाच प्रत्यय काल आला. यापुढेही हे सुरूच राहील’, असा इशारा कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिला. अंबरनाथमध्ये विविध विकासकामांच्या पाहणीसाठी ते आले होते. शिवसेनेच्या सर्वच लोकांशी आमचे ऋणानुबंध आहेत. जे आम्ही तयार केले आणि ठाकरे गट ते संबंध तयार करून शकले नाहीत. त्यामुळेच लोक आमच्याकडे येतात, असेही डॉ. शिंदे यावेळी म्हणाले. त्यामुळे येत्या काळात ठाकरे गटाचे कोणते मोठे मासे शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दिल्लीत एकीकडे लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना दिल्लीत शिवसेना शिंदे गटाच्या वेगळ्या राजकारणामुळे वातावरण तापले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरी झालेल्या स्नेहभोजन कार्यक्रमात ठाकरेंच्या खासदारांनी हजेरी लावल्यामुळे ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आगपाखड केली. तर आदित्य ठाकरे यांनी तातडीने दिल्ली गाठत आपल्या खासदारांची भेट घेत त्यांना अशा कार्यक्रमाला जाण्याआधी पूर्वकल्पना देण्याचे आदेश दिले. मात्र त्यामुळे दिल्लीत शिवसेनेच्या गटांमध्येच युद्ध असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर गुरूवारी कोकणातील शिवसेनेचे जुने नेते आणि माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. कोकणातील मोठा चेहरा केल्याने चर्चेत असलेल्या ऑपरेशन टायगरची पुन्हा चर्चा झाली. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यात महत्वाची भूमिका पार पाडत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी आपल्या मतदारसंघातील अंबरनाथ शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ऑपरेशन टायगरबद्दल मोठा खुलासा केला. ऑपरेशन टायगर हे सुरू राहणार आहे. त्याची प्रचिती नुकतीच आली असून नुकताच मोठा पक्षप्रवेश झाला, असे डॉ. शिंदे म्हणाले. त्यामुळे येत्या काळात शिवसेना शिंदे गटात आणखी कोणते ठाकरेंचे मोहरे जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आमचे जुने ऋणानुबंध
काही लोकांना आमच्या डिनर डिप्लोमसीचा त्रास होतो आहे. मात्र आमचे शिवसेनेतले ऋणानुबंध जुने आहेत. मैत्रीखातर आमच्या स्नेहभोजनाला लोक येतात. त्यांचे आमच्याशी जुने संबंध आहेत. जे ठाकरे गटाचे होऊ शकलेले नाही, असा टोलाही खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी लगावला. आपल्याला लोक का सोडून जात आहेत. महाविकास आघाडीचे लोकही त्यांच्यापासून दूर जात आहेत, याचे त्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे, असेही शिंदे यावेळी म्हणाले.