कोणतेही विशेष कक्ष नसतानाही डाॅ. साळवे यांनी केल्या नऊ महिन्यांत १०२ अस्थिव्यंग शस्त्रक्रिया यशस्वी
शहापूरहून आलेल्या एका मातेच्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे दोन्ही पायाचे पंजे उलटे होते. मातेला काय करावे सुचत नव्हते. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय गाठले. बाळावर उपचार सुरू झाले आणि अवघ्या काही दिवसांत बाळाचे पाय पुन्हा सरळ केले गेले. अशा एक दोन नव्हे तर अनेक अस्थिव्यंगावर शस्त्रक्रिया आणि उपचार मागील नऊ महिन्यांत ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयातील अस्थिव्यंग तज्ज्ञ डाॅ. विलास साळवे यांनी केल्या आहेत. विशेष म्हणजे, जिल्हा शासकीय रुग्णालयात नवी इमारत बांधली जाणार असल्याने मुख्य इमारतही पाडण्यात आली आहे. असे असतानाही अत्यंत कमी सामुग्रीमध्येही जिल्हा शासकीय रुग्णालयातील डाॅक्टर आपले कर्तव्य पार पाडत असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा >>>ठाण्यात करोनामुळे आणखी एक मृत्यु
देशात मार्च २०२० मध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर राज्य सरकारने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय करोना रुग्णालय म्हणून घोषित केले होते. जिल्ह्यातील विविध भागातून करोना झालेल्या रुग्णांंना या रुग्णालयात दाखल केले जात होते. त्यामुळे इतर शस्त्रक्रिया या रुग्णालयात बंद करण्यात आल्या होत्या. २०२२ मध्ये करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जून २०२२ मध्ये हे रुग्णालय इतर रुग्णांच्या उपचारासाठी सुरू करण्यात आले. असे असले तरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या ठिकाणी नव्याने प्रशस्त इमारत बांधण्यात येणार आहे. त्यामुळे जीर्ण झालेली एक इमारत बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे सर्व उपचार हे आपत्कालीन इमारतीमध्येच सुरू आहेत. विशेष कक्ष उपलब्ध नसतानाही ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डाॅक्टर आणि कर्मचारी रुग्णांवर उपचार करत आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणी अपघातात जखमी किंवा अस्थिव्यंगाचे प्रकरण समोर येत असतात. या अस्थिव्यंगावर उपचारासाठी अस्थिव्यंग तज्ज्ञ डाॅ. विलास साळवे यांनी मागील नऊ महिन्यांत १०२ रुग्णांवर शस्त्रक्रिया आणि उपचार केले. यामध्ये तीन लहान बाळ, पाच मनोरुग्ण आणि तीन कैद्यांचाही सामावेश होता. साळवे माणूसकी दाखवित अतिशय लक्षपूर्वक ते रुग्णांच्या प्रकृतीवर उपचार करतात असे रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, या सर्व शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत केले जात आहेत. त्यामुळे या रुग्णांवर मोफत उपचार झाले आहेत. या योजनेचा लाभ रुग्णांना मिळावा यासाठीही साळवे हे परिश्रम घेताना दिसतात.
जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. कैलाश पवार, मुख्य फार्मसी अधिकारी डाॅ. सुभाष पवार आणि महात्मा फुले जन आरोग्य विभागाचे डाॅ. संदीप ढुबे तसेच माझ्या सहकाऱ्यांशिवाय यांचा यामध्ये मोलाचा सहभाग आहे. यांच्याशिवाय या शस्त्रक्रिया पूर्ण करणे शक्य नव्हते. त्यामुळे मागील नऊ महिन्यांत १०२ अस्थिव्यंग शस्त्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत. – डाॅ. विलास साळवे, अस्थिव्यंग तज्ज्ञ.