पाऊस उंबरठय़ावर आला तरी कल्याण-डोंबिवली पालिकेची अद्याप नालेसफाईची कामे सुरूझालेली नाहीत. या वेळी तर पावसाच्या तोंडावर शहरातील मुख्य, गल्लीबोळातील रस्ते सिमेंट, गटार, जल, मलवाहिन्या बदलण्याच्या कामांसाठी खोदून ठेवले आहेत. येत्या पंधरा दिवसांत ही कामे पूर्ण होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे हा रस्त्यावरील माती, सिमेंटचा सगळा मलबा गटार, नाल्यांमध्ये वाहून जाणार आहे. गटारे सफाई या वेळी सफाई कामगारांकडून करून घेण्यात येणार आहे. त्यात कितपत यश मिळेल याबाबतीत साशंकता आहे. पालिकेने पावसाळ्यापूर्वी योग्य रीतीने नालेसफाई केली नाही तर पुढील चार महिने त्याचा रहिवासी, वाहनचालकांना त्रास होतो. शहरातील रस्ते, गटारे, पदपथ कामात प्रचंड अनागोंदी सुरू असताना आयुक्तांचे या महत्त्वप्रू्ण विषयाकडे लक्ष नाही. याविषयी सामान्यांचा मनात चिंतेचा सूर उमटू लागला आहे.

पाऊस पंधरा दिवसावर येऊन ठेपला आहे. पावसाळ्यापूर्वी कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, २७ गाव परिसरांतील सर्व लहान-मोठे नाले, गटारे, ओढय़ांची साफसफाई होणे आवश्यक आहे. यापूर्वी ही नालेसफाईची कामे एक महिना अगोदर सुरू व्हायची. म्हणजे ३१ मेपर्यंत नाले, गटारे सफाईची कामे पूर्ण झालेली असायची. या वेळी प्रथमच ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आचारसंहितेत नालेसफाई अडकली. अखेर विशेष बाब व अत्यावश्यक काम म्हणून निवडणूक आयोगाने कल्याण-डोंबिवली पालिकेच्या नालेसफाईच्या कामाला परवानगी दिली आहे. त्यामुळे नालेसफाई कामाची निविदा उघडणे, कामाचे आदेश देणे ही कामे वळवाच्या पावसात सुरू होतील. पालिका हद्दीत पूर्व भागातील टिटवाळा ते पश्चिमेतील कोपर, दक्षिणेकडील खडेगोळवली ते उत्तरेकडील गंधारे अशा चौरस भौगोलिक क्षेत्रात ४२ हजार ६२० मीटर लांबीचे ४३ नाले आहेत. शहरातील नियमित सांडपाण्याबरोबर पावसाळ्यातील गटारे, लहान नाल्यांमधून वाहून येणारे पाणी खाडीपर्यंत पोहोचविण्यास मोठे नाले महत्त्वाची भूमिका बजावतात.
यापूर्वी कल्याण-डोंबिवली शहरे आटोपशीर होती. सांडपाण्याचे प्रमाण कमी होते. आता सुमारे दोनशे दशलक्ष लीटर सांडपाणी दररोज नाल्यांच्या प्रवाहांमधून खाडीत सोडले जाते. गेल्या वर्षीपासून २७ गावांमधील गटारे, नाल्यांच्या सफाईच्या कामांची जबाबदारी पालिकेवर आली आहे.
मुसळधारा पाऊस सुरू झाला की, शहरातील कोपर, खडेगोळवली, गायत्रीधाम नाला, मिलिंदनगर, भवानीनगर नाला, वालधुनी नाला, उंबर्डे ते वाडेघर खाडीपर्यंतचा नाला, जरीमरी नाला, काळा तलाव नाला, खडेगोळवली नाला, तिसाई मंदिर नाला, कांचनगाव, वसंतवाडी नाला, रामचंद्रनगर, राजपार्क ते रेल्वे पूल, आयरे ते स्मशानभूमी, भरत भोईर, गुप्ते क्रॉस नाला हे महत्त्वाचे नागरी वस्तीमधून गेलेले नाले नेहमीच डोकेदुखी ठरतात. या नाल्यांच्या काही भागांत काही व्यावसायिक, राजकीय वतनदारांनी वाढीव बांधकामे करून नाल्यांचे मार्ग आक्रसून टाकले आहेत. शहर स्वच्छतेपेक्षा आपली राजकीय उदरभरणाची ‘दुकाने’ व्यवस्थित चालणे आवश्यक असल्याने, ही राजकीय मंडळी नालेसफाईच्या वेळी साफसफाई करण्यास येणाऱ्या कामगारांना, जेसीबी, पोकलेनचालकांना त्या त्या भागात सफाई करण्यास मज्जाव करतात. कारण जेसीबीच्या फटक्याने नाल्याचा आक्रसून टाकलेला भाग पुन्हा मोठा झाला तर, नाल्यावर स्लॅब टाकून तयार केलेले ‘दुकान’ थेट नाल्यात वाहून जाईल, अशी भीती काही व्यावसायिक आणि राजकीय दुकानदारांना आहे. टिटवाळा, कल्याणमधील शिवाजी चौक, डोंबिवली गुप्ते रस्ता, आयरे प्रभाग, एमआयडीसी, कांचनगाव, गांधीनगर या भागांतून वाहत असलेल्या नाल्यांच्या आजूबाजूचा भाग विकासक, व्यावसायिक, जमीन मालक यांनी जागोजागी आक्रसून टाकले आहेत. याप्रकरणी अनेक तक्रारदारांनी पालिकेकडे आक्रसलेल्या नाल्यांबाबत तक्रारी केल्या आहेत.
ठेकेदारांचा प्रभाव
पालिकेकडून नाल्यांची कामे वर्षांनुवर्षे ठरावीक ठेकेदारांना दिली जातात. हे ठेकेदार अधिकाऱ्यांच्या संगनमताने काम करीत असल्याने, नालेसफाई केल्याचा फक्त देखावा निर्माण केला जातो. नालेसफाई सुरू आहे हे दाखविण्यासाठी पत्रीपुलाजवळील सवरेदय नाला, रेल्वे स्थानकाजवळील जरीमरी नाला, पालिका पदाधिकाऱ्यांच्या घरांलगतच्या नाल्यांमध्ये दोन दोन दिवस जेसीबी, पोकलेन तळ ठेवून पदाधिकाऱ्यांना नाल्यातून गाळ काढण्यात येत असल्याचे भासविले जाते. पदाधिकारीही आपल्या घराजवळील नाला साफ करण्यात येत असल्याने शांत राहतात. प्रत्यक्षात ही नालेसफाई फक्त ठरावीक भागात होते. पाऊस तोंडावर आला की पोकलेन नाल्यात उतरवून गाळ काढून काठावर ठेवला जातो. जो पुन्हा नाल्यातच जातो. कंत्राटदार, लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळेच नालेसफाईच्या कामात पारदर्शकता नाकारली जाते.
प्लास्टिकच्या पिशव्यांचा फास
शहरात बेसुमार प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू आहे. त्यामुळे नाल्यांमध्ये सांडपाण्यापेक्षा प्लास्टिक पिशव्यांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळते. या पिशव्या नालीत एखाद्या ठिकाणी अडकून बसल्या की पाण्याचा प्रवाह अडकून पडतो. यापूर्वी शहर आटोपशीर होते. बांधकाम व्यवसाय तेजीत नव्हता. आता शहराच्या चोहोबाजूने बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांचा सगळा मलबा विविध मार्गाने नाल्यात टाकला जातो किंवा नाल्यात वाहून येतो. अलीकडे नाल्यांमध्ये गाळ, कचऱ्यापेक्षा मलबा सर्वाधिक आढळून येतो. शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा विडा पालिकेने उचलला आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या विकणाऱ्या, ग्राहकांना देणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. पण या पिशव्या व्यापाऱ्यांनी वर्षांनुवर्षे साठून ठेवल्या असल्याने ते लगेच त्या रस्त्यावर फेकून देणार नाहीत. त्याचा कमी-अधिक प्रमाणात वापर करणार आहेत.
कल्याण-डोंबिवलीतील रस्ते जागोजागी सिमेंट रस्ते, गटारे, पदपथ या कामांसाठी खोदून ठेवले आहेत. ही कामे येत्या पंधरा दिवसांत पूर्ण होण्याची सुतराम शक्यता नाही. जागोजागी माती, मलब्याचे ढिगले पडून आहेत. हा सगळा मलबा, माती आजूबाजूच्या गटार, नाल्यांमधून वाहून जाणार आहे. सुरू असलेली कामे पाऊस सुरू झाला की तात्पुरती माती टाकून झाकून ठेवली जातील आणि त्यामुळे तयार होणारा चिखल चार महिने प्रवासी, वाहनचालकांना त्रासदायक होणार आहे. तसेच, या ठिकाणी वाहने रुतून बसतील आणि निर्माण होणारी वाहतूक कोंडी शहरवासीयांची डोकेदुखी वाढविणार आहे. याचे भान आयुक्त ई. रवींद्रन यांना कोणीही अधिकारी आणून देत नाही. ज्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी पालिकेच्या विकासकामांची वाट लावली, त्याच वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या हातात आयुक्तांनी विभागप्रमुखांचे लगाम दिले आहेत. त्यामुळे दुय्यम दर्जाचे अधिकारी नाराज आहेत.
निर्णय स्तुत्य पण..
शहरातील प्रभागांमधून वाहणारी, रस्त्याच्या कडेची गटारे साफ करण्याचे काम प्रथमच मजूर संस्थांना न देता ते पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी साफ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. हा निर्णय अगदी स्तुत्य आहे. गेल्या वीस वर्षांत गटारे सफाईची कामे नगरसेवकांच्या समर्थक मजूर संस्थांना दिली जात होती. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत आनंदच असतो. पालिकेतील नगरसेवकांची ही दुकानदारी एका दक्ष नगरसेवकाच्या तक्रारीवरून दोन वर्षांपूर्वी शासनाने तडकाफडकी बंद केली.
आता प्रभागातील गटारे साफ करण्याचे काम सफाई कामगारांनीच करायची आहेत. मात्र कामगारांची कार्यक्षमतेविषयी शंका आहे. वर्षांनुवर्षे विशिष्ट प्रभागात ठरावीक आरोग्य निरीक्षक, ठरावीक सफाई कामगार काम करतात. हप्तेबाजीचे मोठे रॅकेट वर्षांनुवर्षे या व्यवस्थेत काम करते. ही सगळी यंत्रणा स्थानिक नगरसेवकाच्या घरी घरगडय़ासारखी वावरते. त्यामुळे या व्यवस्थेला काही धक्का लागणार नाही याची पुरेपूर काळजी नगरसेवक मंडळी घेतात. या नगरसेवकांना शहर स्वच्छतेपेक्षा आपले घर, बंगला, मंदिर आणि परिसर कसा स्वच्छ राहील याची विशेष काळजी असते. त्यामुळे आरोग्य निरीक्षक आणि कामगार या विषयावर नगरसेवकांचे ‘प्रामाणिक’ मौन असते. प्रशासनाने या वेळी मजूर संस्थांऐवजी सफाई कामगारांकडून गटार सफाई करून घेण्याचा निर्णय घेतला तो योग्यच आहे, पण कामगारांकडून कामे करून घेणे आवश्यक आहे.

Story img Loader