घोडबंदर भागासाठी चितळसर-मानपाडा परिसरात लहान मुलांच्या दफनविधीतही अनंत अडचणी येत असल्याची माहिती समोर आली आहे. या स्मशानभूमीत लहान मुलांच्या दफनविधीसाठी मोकळी जागा आहे. मध्यंतरी, महापालिकेने स्मशानभूमीमधील झाडांच्या फांद्या छाटून त्या लहान मुलांच्या दफनविधीच्या जागेवर टाकून दिल्या. झाडांचा पालापाचोळा अजूनही दफनविधीच्या जागेवर पडलेला आहे. स्मशानभूमीत महापालिकेचा कर्मचारीही नाही. त्यामुळे पालापाचोळ्याच्या कचऱ्यातून जागा शोधत नागरिकांनाच दफनविधी पार पाडावा लागतो. तसेच दफनविधीच्या जागेला खेटून स्मशानाची संरक्षक भिंत असून या भिंतीच्या पल्याड चाळी आहेत. चाळीतील रहिवाशांनी स्मशानाच्या संरक्षक भिंतीला खेटून घरे उभारली असून घरातील सांडपाणी वाहून नेणारे पाइप स्मशानभूमीच्या आतमध्ये सोडले आहेत. त्यामुळे पाइपद्वारे येणारे सांडपाणी दफनविधीच्या जागेवर येते. विधीपूर्वक लहान मुलांचा अंत्यविधी करण्यात येतो खरा, पण या प्रकारामुळे चिमुरडय़ांच्या नशिबी मात्र नरकयातनाच येतात, असे म्हणावे लागेल. या प्रकारामुळे त्या चाळीतील रहिवाशांच्या संवेदना संपल्याचे समोर येते. यासंबंधी वारंवार तक्रारी येऊनही महापालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.
नीलेश पानमंद, ठाणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा