सध्या बच्चेकंपनीच्या सुट्टय़ा सुरू आहेत, या सुट्टय़ा सत्कारणी लावाव्यात, एखादा छंद जोपासावा अशी इच्छा पालकांची असते, यासाठी मग अभिनय कार्यशाळा, छंद वर्ग, समर कॅम्पसारखा पर्याय निवडला जातो. सुट्टी वगळता वर्षभर बालनाटय़ शिबिरे घेणाऱ्या संस्थांचे बालनाटय़ाचे प्रयोग सध्या सर्वच नाटय़गृहात सुरू आहेत. यात मुलेही मस्त एन्जॉय करत असल्याचे चित्र ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये नुकतेच पाहायला मिळाले. आपल्याच वयाची मुले रंगमंचावर कला सादर करताना पाहून त्यांच्या कलाकृतीला प्रोत्साहन देण्याचे काम ही बालरसिकांनी केले.
बालनाटय़ प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत, प्रत्येक संस्था ही मुलांना प्रशिक्षण देऊन बालनाटय़ाचे प्रयोग करून मुलांना आपले कलागुण सादर करण्याची संधी देतात, सुट्टीत बालनाटय़ांना जरी प्रेक्षकांचा प्रतिसाद फारच कमी असतो, याचे एक कारण म्हणजे बालनाटय़ाच्या तिकिटाचे दर हे सर्वसामान्यांना परवडत नाही. या नाटकात काम करणाऱ्यांचे पालक, नातेवाईक वगळता प्रेक्षकांची संख्या म्हणावी तितकी नसते. जास्तीत जास्त बालरसिक या नाटकांना यावेत, यासाठी एक तर तिकिटाची रक्कम कमी ठेवणे आवश्यक आहे. तसेच बालनाटय़ाच्या प्रयोगासाठी निर्मात्याकडून कमी भाडे आकारले तरच ते परवडू शकेल. यासाठी ज्या भागात नाटय़गृह आहे तेथील महापालिकांनी यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. प्रत्येक ठिकाणी जेव्हा बालनाटय़ाचे प्रयोग असतात, त्या वेळी पालक आपल्या मुलांना त्या ठिकाणी घेऊन जातात.
ज्या शहरात नाटय़गृह आहे, त्या शहरात जर एखादी नाटय़कलावंतासाठी बस असेल तर निश्चित त्याचा फायदा या बालनाटय़संस्थांना होईल. व्यावसायिक नाटकांसाठी प्रत्येक संस्थांनी नाटकाचे नेपथ्य ने-आण करण्यासाठी सोय केलेली असते. तसेच नाटकातील कलावंत हे प्रयोगाच्या ठिकाणी पोहोचत असतात. पण जर नाटय़गृहांनी स्वत:ची बस उपलब्ध करून दिली तर त्याचा फायदा हा निश्चितच या छोटय़ा संस्था घेतील. आज ठाण्यात अनेक बालनाटय़ शिबिरे घेणाऱ्या संस्था आहेत, या सर्व संस्थाचालकांनी एकत्र येऊन ठाणे शहरात बालकलाकारांसाठी बस उपलब्ध करून घेण्यासाठी जर नाटय़गृह व्यवस्थापन किंवा त्या शहरातील महापालिकांशी संपर्क साधून प्रयत्न केले तर निश्चितच यतून मार्ग निघू शकेल, असे मत पालकांनी व्यक्त केले. कारण अनेकदा मुलांना प्रयोगासाठी डोंबिवली, कल्याण, बोरिवली, विलेपार्ले येथे घेऊन जाणे वेळेअभावी शक्य नसते. तसेच मुलांसाठी भाडय़ाने बस करणे हेदेखील नेहमीच परवडणारे नसते. जर नाटय़गृहाची बस असेल तर ती सर्वच नाटय़संस्थांना किंवा पालकांना माफक भाडय़ात परवडू शकते, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर नाटय़गृहांनी बस उपलब्ध करावी, असेही मत मैथिली पाटकर या पालकांनी व्यक्त केले.
ठाणे तेथे काय उणे, असे वारंवार म्हटले जाते. ठाण्याने विविध क्षेत्रांतील खेळाडूंच्या माध्यमातून आपला नावलौकिक कायम ठेवला आहे, यासाठी ठाण्यातील नाटय़गृहांनी जर नाटय़संस्थांना बस उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक विचार केला तर त्यातून येणारे भाडे हे नाटय़गृहास मिळेल पर्यायाने उत्पन्नाचे साधन म्हणूनही त्याचा फायदा होईल हे निश्चित.

Story img Loader