पाण्यात क्षारांचे प्रमाण अधिक; पिण्यायोग्य नसल्याचा धक्कादायक निष्कर्ष

वसईच्या पश्चिम पट्टय़ातील रहिवाशांना विहिरीचे पाणी प्यावे लागत असून जवळपास सर्वच विहिरींचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष जलतपासणीनंतर काढण्यात आला आहे. गावातील ५० ठिकाणच्या पाण्याच्या नमुन्यांवर आठ तपासण्या करण्यात आल्या, त्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या पाण्यात क्षार, क्लोराइडचे प्रमाण अधिक असून ते आरोग्यास हानीकारक असून हे पाणी पिण्यायोग्य असल्याचे तपासणीनंतर पुढे आले आहे.

वसईच्या पश्चिम पट्टय़ातील रहिवाशांचा विहीर हाच एकमेव जलस्रोत आहे. गेल्या काही वर्षांपासून येथील ग्रामस्थांना विविध आजारांची लागण होत आहे. ‘पाणी वाचवा’ या मोहिमेअंतर्गत काम करत असताना ‘स्वाभिमानी वसईकर’ या संस्थेला याबाबतची माहिती मिळाली. पाण्यात वाढलेले क्षार, गढूळपणा आणि बदललेली चव त्यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे संस्थेचे कार्यकर्ते व रसायनतज्ज्ञ ऑल्विन रॉड्रिक्स यांनी पाण्याची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. एप्रिल ते जून या कालावधीत मूळगाव, रमेदीपासून बोळिंज, राजोडी, आगाशी, नंदाखाल यांच्यासह वेगवेगळ्या गावांतील विहिरींतून ५०पेक्षा जास्त पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले. प्रत्येक पाण्याच्या नमुन्यावर ८ चाचण्या करण्यात आल्या. पाण्यात आवश्यक घटक कोणते आहेत आणि विषारी, अयोग्य घटक कोणते आहे याची धक्कादायक माहिती समोर आली. हे पाणी दूषीत असून पिण्यास अयोग्य असल्याचे तपासणीनंतर समोर आले आहे. या परिसरात रहिवासी आजारी पडण्याचे कारण हेच दूषीत पाणी असल्याचे रॉड्रिक्स यांनी सांगितले.

इलेक्ट्रॉनिक कचरा विहिरींमध्ये

पाण्यातील विषारी घटकांचा प्रादुर्भाव वाढत चालल्याचे या चाचण्यांवरून दिसत आहे. बावखले, तळे, वापरात नसलेल्या विहिरी मोठे खड्डे यामध्ये वापरलेले सेल (बॅटरी), मोबाइलमधील खराब झालेली बॅटरी, खराब झालेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे, रसायने टाकली जात आहेत. ते झिरपून विहिरींचे पाणी प्रदूषित होत असल्याचे रॉड्रिक्स यांनी सांगितले. हा अहवाल पालिका, प्रांत आणि विविध शासकीय यंत्रणांकडे सादर केला जाणार आहे.

पाण्यात कोणते घटक?

  • नंदाखाल, बोळिंज, नानभाट, आगाशी, उमराळे, निर्मळ, गास, भुईगाव या सर्वच गावांतील पाण्यात क्षाराचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात आढळले आहे. हे प्रमाण ब ७०० पासून १५०० ते २०० मिलिग्रॅम प्रतिलिटर आहे. मूत्रपिंडांसह शरीरातील विविध अवयवांवर, केसांवर क्षारांचे दुष्परिणाम होतात.
  • या पाण्याचा सामू (पीएच) ८.५ आहे. काही ठिकाणी पाण्याचा सामू ९ ते ९.५ पर्यंत असल्याचे आढळून आले. त्यांचा परिणाम शरीरातील पेशींवर होतो, त्याशिवाय कर्करोगही होऊ शकतो.
  • पाण्यात जंतू, माती व रसायनेही आढळली असून त्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.
  • पाण्यात क्लोराइडचेही प्रमाण जास्त आढळून आले आहे. सामान्य मानकाप्रमाणे त्याचे प्रमाण २५० मिलिग्रॅम प्रति लिटर असणे आवश्यक आहे. मात्र बोळींज-जापके, नंदाखाल, भुईगाव या ठिकाणी क्लोराइडचे प्रमाण ३०० मिलिग्रॅम प्रति लिटर आढळले आहे. नैसर्गिकरीत्या अतिउपशामुळे खारे पाणी स्वच्छ पाण्याची जागा घेत आहे.
  • आगाशी, नंदाखाल, बोळिंज या ठिकाणी नायट्रेटचे प्रमाण ४५ पासून १०० मिलिग्रॅमपर्यंत प्रतिलिटर असे आढळले आहे. हा घटक जास्त प्रमाणात असल्यास लहान मुले व गर्भवती महिलांना त्याची बाधा होऊ शकते.

लोह आणि फ्लुराइडचे प्रमाण योग्य

पाण्यातील विषारी घटक वाढत असताना लोह आणि फ्लुराइडचे प्रमाण मात्र योग्य असल्याचे आढळून आले. पाण्यामध्ये लोहाचे प्रमाण ०.३ मिलिग्रॅम प्रति लिटर आवश्यक असते.

चाचण्यांमध्ये लोहाचे प्रमाण योग्य असल्याचे आढळून आले, तर १ मिलिग्रॅम प्रति लिटर फ्लूराइडचे प्रमाण योग्य मानले जाते, तेदेखील योग्य प्रमाणात असल्याचे रॉड्रिक्स यांनी सांगितले.

Story img Loader