|| रमेश पाटील
यंदा पाऊस कमी झाल्याने उत्पादनात घट; शेतकऱ्यांवर कर्जबाजारीपणाची वेळ
वाडा तालुक्यातील गातेस गाव हे पालघर जिल्ह्यातील ‘हरभऱ्याचे गाव’ म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यात रब्बी हंगामात सर्वाधिक हरभऱ्याचे उत्पादन या गावात होत असून ८० ते ८५ लाख रुपयांचा फायदा दरवर्षी होतो. मात्र यंदा पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळ पडला असून त्याचा परिणाम हरभरा पिकावर झाला आहे. दरवर्षीपेक्षा यंदा केवळ १० टक्केच उत्पादन झाले असून अनेक शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.
वाडा शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर आणि वाडा-भिवंडी या राज्य महामार्गालगत असलेल्या गातेस खुर्द व गातेस बुद्रुक ही दोन्ही गावे हरभरा पिकाचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. हरभरा पीक लवकर आणि दर्जेदार येण्यासाठी येथील बरेचसे शेतकरी खरीप हंगामात भाताचे पीक न घेता शेतजमीन तशी ठेवतात आणि ऑक्टोबर महिन्यात हरभरा पिकाची पेरणी करतात. दोन महिन्यांत तयार होणाऱ्या हरभऱ्याच्या विक्रीतून गावाला ८० ते ८५ लाखांचा फायदा होतो. मात्र यंदा निसर्गाने अवकृपा केल्याने गावात केवळ १० टक्केच हरभऱ्याचे पीक आले आहे. पाण्याअभावी पीक जळून गेले आहे, तर काही ठिकाणी दाणा पूर्णपणे भरलेला दिसून येत नाही.
हरभरल्याला मोठी मागणी असल्याने आणि भावही चांगला मिळत असल्याने येथील शेतकरी मुंबई परिसरातील बाजारपेठांमध्ये हरभरा पाठवतात. गावांतील ५० ते ५५ शेतकऱ्यांना त्यामुळे लाखो रुपयांचा फायदा होतो. मात्र यंदा परतीचा पाऊस पडला नाही. त्यामुळे हरभरा पिकासाठी ओसाड ठेवलेल्या जमिनीत अनेक शेतकऱ्यांना पीकच घेता आले नाही. जमिनीतील थोडाफार ओलावा पाहून काही शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी केली. मात्र कमी ओलावा आणि खराब हवामानामुळे या पेरण्या वाया गेल्या. गावातील ४७ शेतकऱ्यांनी सेवा सहकारी संस्थांमधून हरभरा पिकासाठी कर्ज घेतले होते. मात्र खरीप हंगामात भाताचेही पीक घेता आले नाही आणि रब्बी हंगामात हरभरा पीकही घेता न आल्याने अनेक शेतकऱ्यांसमोर कर्जाची परतफेड कशी करायची, असा प्रश्न आ वासून उभा आहे.
नुकसानीचे पंचनामे झालेले आहेत, मात्र आतापर्यंत भरपाईबाबत प्रशासनाकडून काहीच उत्तर मिळालेले नाही. – कुमार पष्टे, शेतकरी.
येथील शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करतात, मात्र यंदा रब्बी हंगामात ९० टक्के नुकसान झाल्याने कर्जाची वसुली कशी करणार? – दामोदर पाटील, अध्यक्ष, सेवा सहकारी संस्था.