|| भाग्यश्री प्रधान
गवार, भेंडी ८० रुपये, काकडी ५० रुपये किलो
मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या परिसराला भाज्यांचा पुरवठा करणाऱ्या पुणे आणि नाशिक जिल्ह्यातून आवक घटल्याने गेल्या काही दिवसांपासून भाज्यांचे दर वाढले आहेत. एरवी घाऊक बाजारात दहा रुपयांच्या आत विकला जाणाऱ्या फ्लॉवर, कोबीचे दरही २० ते २५ रुपयांच्या घरात पोहचले आहेत. किरकोळ बाजारात गवार ८० रुपयांवर तर काकडी ३० रुपयांवरून ५० रुपयांवर पोहोचली आहे. पाण्याची कमतरता आणि कडाक्याच्या थंडीमुळे आवक घटू लागल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
नवी मुंबई, ठाणे, मुंबई आणि आसपासच्या परिसराला जुन्नर, नाशिक, पुणे, बंगळूर येथून भाज्यांचा पुरवठा होतो. गेल्या काही वर्षांपासून वाशीतील कृषी उत्पन्न बाजारात बाराही महिने परराज्यातील भाजी येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून बागायती पट्टय़ावर दुष्काळाचे सावट असून याच भागात पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे भाज्यांची आवक रोडावल्याची माहिती ओतुरचे शेतकरी गणेश हांडे यांनी दिली. दुष्काळामुळे भाज्यांना पुरेसे पाणी मिळत नाही. तसेच कडाक्याच्या थंडीमुळे फळभाज्यांची वाढ खुंटते. त्यामुळे काकडीचे उत्पन्न घटून ५० टक्क्यांवर आले आहे. गेल्या आठवडय़ात घाऊक बाजारात २५ रुपये किलोने मिळणारी सिमला मिरची सध्या ३० रुपये किलोने तर किरकोळीत ६० रुपये किलोने विकली जात आहे. घाऊक बाजारात एरव्ही ३० रुपये किलोने मिळणारी गवार सध्या ५० रुपयांनी विकली जात असल्याने किरकोळीतही गावरचे भाव वधारले आहेत.
टोमॅटोचे उत्पादनही घटले असून घाऊक बाजारात २४ रुपयांनी मिळणारा टोमॅटो किरकोळ बाजारात मात्र ४० ते ५० रुपये किलोने विकला जात असल्याची माहिती कल्याण कृषी समितीचे अधिकारी यशवंत पाटील यांनी दिली. नाशिक येथून मुंबईत विक्रीसाठी येणारी कोथिंबीरची मोठी जुडीही घाऊक बाजारात २५ तर किरकोळीत ५० ते ५५ रुपयांना विकली जात आहे. किरकोळ बाजारात गेल्या आठवडय़ात २० रुपये किलोने मिळणारा कोबी सध्या किरकोळीत ४० रुपये किलोने विकला जात आहे.
या महागाईत केवळ मटारने ग्राहकांना दिलासा दिला आहे. मटारचे उत्पन्न चांगले असून तो किरकोळ बाजारात २५ ते ३० रुपये किलोने विकला जात आहे. भाव पुढील आठवडय़ात आणखी वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे.
दुष्काळ आणि थंडीच्या कडाक्यामुळे भाज्यांचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव आणखी वधारण्याची शक्यता आहे. सध्या घाऊक बाजारात प्रत्येक भाजीच्या दरात १० टक्के वाढ झाली आहे. – शामकांत चौधरी, सचिव, कल्याण कृषी बाजार समिती