छेडछाड, शिवीगाळीच्या भीतीमुळे प्रवाशांची पुलाकडे पाठ

कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी एमआरव्हीसी (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन)च्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या नव्या रेल्वे पादचारी पुलाचा ताबा उद्घाटनापूर्वीच गर्दुल्ल्यांनी घेतला आहे. विठ्ठलवाडीकडील बाजूच्या नव्या पुलावर रात्रंदिवस सुमारे पन्नास ते शंभर गर्दुल्ल्यांची टोळी नशापाणी करून पडून असते. त्यांच्या भीतीमुळे प्रवासी पादचारी पुलाकडे फिरकेनासे झाले आहेत. अत्याधुनिक पद्धतीने बांधलेल्या या पुलास दोन्ही बाजूला काचा बसवण्यात आल्या असून चार उद्वाहकांची सोयही करण्यात आली आहे. पुलाची काही किरकोळ कामे बाकी आहेत. मात्र तत्पूर्वीच गुर्दुल्ले, भिकारी यांनी पुलावर बस्तान मांडले आहे.

कल्याण स्थानकातील जुन्या पादचारी पुलापासून काही अंतरावर फलाटाच्या बाहेरील बाजूस एमआरव्हीसीच्या माध्यमातून एक मोठा पादचारी पूल उभारण्यात आला आहे. सॅटिस आणि जुन्या पुलालाही हा नवा पादचारी पूल जोडण्यात आला आहे. त्याचबरोबर त्याच्यावरून रेल्वे फलाटांवर पोहोचण्यासाठी उद्वाहकांची सोयही करण्यात आली आहे. त्यामुळे कल्याणकर प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. मात्र पुलाचे बांधकाम पूर्ण होताच गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांनी त्याचा ताबा घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना या पुलावरून ये-जा करणे कठीण बनले आहे. येथील गर्दुल्ल्यांचे टोळके इतके निर्ढावलेले आहे की रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी इथून गेले तरी ते उठत नाहीत.

या प्रकरणी रेल्वे प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली असून या भागात रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलिसांची कुमक पाठवून हा परिसर फेरीवालामुक्त करण्याची गरज उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाकडून व्यक्त करण्यात आली आहे. यासंबंधी रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

कल्याण रेल्वे स्थानकातील नव्या आणि जुन्या पुलांवर तसेच स्कायवॉकवर मोठय़ा संख्येने भिकारी, गर्दुल्ले आणि फेरीवाले बसत असल्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. या पुलाखालून रेल्वे मार्ग जात असल्यामुळे या गर्दुल्ल्यांकडून घातपाताचाही प्रकार घडमू शकतो. त्यामुळे प्रशासनाने हा विषय अधिक गांभीर्याने हाताळण्याची गरज आहे. 

– राजेश घनघाव, कल्याण, कसारा, कर्जत प्रवासी संघटना

Story img Loader