कल्याण – कल्याणमध्ये एक औषध दुकान सुरू करण्यासाठी एक लाख रूपयांची लाच मागणारा कल्याण विभागाचा अन्न आणि औषध प्रशासनाचा औषध निरीक्षक संदीप नारायण नरवणे आणि कल्याण मधील या लाचेसाठी मध्यस्थी करणारा औषध विक्रेता सुनील बाळू चौधरी (५७) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई पथकाने येथील डी मार्ट समोरील रस्त्यावर सोमवारी रंंगेहाथ अटक केली.
गेल्या महिन्यात पालघर जिल्ह्यात एका औषध दुकानाच्या पाहणीत एका महिला औषध निरीक्षकाने काही त्रृटी काढल्या होत्या. हे प्रकरण बाहेर येऊ नये म्हणून महिलेने एका खासगी इसमातर्फे औषध दुकानदाराला एक लाखाची लाच देण्याची मागणी केली होती. ही महिला अधिकारी नंंतर लाचलुचप्रतिबंधक विभाग पथकाने सापळा लावून लाच घेताना अटक केली.
हेही वाचा >>>कल्याणमध्ये धोकादायक इमारतीचा भाग चाळीवर कोसळला, दोन महिला जखमी
अलीकडे औषध निरीक्षक औषध दुकानादारांना अधिक प्रमाणात त्रास देत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, कल्याणमध्ये तक्रारदाराला पटेल मेडिकल नावाने औषध दुकान सुरू करायचे होते. या दुकानाचा परवाना मंजूर करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अन्न निरीक्षक संदीप नरवणे आणि औषध विक्रेता खासगी इसम सुनील बाळू चौधरी यांनी तक्रारदाराकडे एक लाख रूपये लाच देण्याची मागणी केली होती. आपण एवढी रक्कम देऊ शकत नाही, असे तक्रारदाराने नरवणे यांना सांगितले होते.
हेही वाचा >>>वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल; खंडणी प्रकरण
तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई पथकाकडे तक्रार केली. या पथकाने दोन दिवस पडताळणी केल्यानंतर नरवणे, चौधरी तक्रारदाराकडे लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीने तक्रारदाराने एक लाख रूपयांऐवजी ७० हजार रूपये देण्याचे कबूल केले. तक्रारदार लाचेची रक्कम घेऊन सोमवारी कल्याणमधील डी मार्ट समोरील सार्वजनिक रस्त्यावर खासगी इसम सुनील चौधरी यांच्या ताब्यात ७० हजार रूपये देत होता, त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चौधरी आणि त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या औषध निरीक्षक संदीप नरवणे यांच्यावर झडप घालून त्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.