लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : कल्याण जवळील आंबिवली इराणी वस्तीमधील एका गुन्हेगाराला पोलीस उपायुक्तांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक आणि खडकपाडा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने संयुक्त कारवाई करून मेफोड्रोन या अंमली पदार्थांची तस्करी करताना आंबिवली अटाळी भागातील बंदरपाडा भागातून बुधवारी संध्याकाळी अटक केली.
हाशमी जाफर हुसैन जाफरी (३३) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. मानपाडा पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात हाशमीवर यापूर्वी संघटित गुन्हेगारी कायद्याने (मोक्का) कारवाई झाली होती. हाशमीवर महात्मा फुले पोलीस ठाण्यात यापूर्वीच दोन गुन्हे दाखल आहेत.
मागील आठ महिन्यांपासून पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कल्याण, डोंबिवली शहरात नशामुक्त अभियान सुरू केले आहे. कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांची तस्करी शहरात होता कामा नये. अंमली पदार्थाचा एकही अड्डा शहरात दिसता कामा नये यासाठी उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली एक फिरते अंमली पदार्थ विरोध पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक दररोज दिवस, रात्र शहरांच्या विविध भागात गस्त घालत असते. या पथकाच्या माध्यमातून आतापर्यंत एक हजाराहून अधिक अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या आणि तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. शहरातील दारू, अंमली पदार्थांचे अड्डे उध्वस्त करण्यात आले आहेत.
अशाच कारवाईचा भाग म्हणून विशेष अंमली पदार्थ विरोधी पथक बुधवारी संध्याकाळी आंबिवली अटाळी भागातील बंदरपाडा भागात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना दुचाकीवरील एक इसम संशयास्पद हालचाली करत असल्याचे दिसून आले. पोलिसांना पाहताच तो गोंधळला. त्याला पळून जाण्याची कोणतीही संधी न देता गस्तीवरील पथकाने त्याला घेरले. त्याला याठिकाणी काय करतोस, तुला कुठे जायचे आहे असे प्रश्न केले. या प्रश्नांनी इसम गोंधळला. पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी पहिले त्याचे नाव विचारले. त्याने हाशमी जाफरी असे नाव सांगितले.
पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी तो झडतीला नकार देत होता. परंतु, पोलिसांनी आक्रमक भूमिका घेताच त्याने झडतीस सहकार्य केले. त्यावेळी हाशमी जाफरीजवळून पोलिसांना १५ ग्रॅम वजनाचे मेफोड्रोन आढळून आले. बाजारातील या अंमली पदार्थाची किंमत तीस हजार रूपये आहे. पोलिसांनी हाशमीला तात्काळ ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल केला.
हाशमीने एम. डी. पावडर कोठुन आणली होती. तो ती पावडर कोणाला विक्री करणार होता याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय नाईक, साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, विजय गायकवाड, उपनिरीक्षक जितेंद्र ठोके, हवालदार अमित शिंदे, खुशाल नेरकर, राहुल शिंदे, अनंत देसले, सतीश मुपडे यांच्या पथकान ही कारवाई केली. गेल्या महिन्यात तमीळनाडूत चोरी करताना इराणी वस्तीमधील एका कुख्यात गुन्हेगार तमीळनाडू पोलिसांच्या चकमकीत ठार झाला होता.