डोंबिवली – ‘तांबडी चामडी..लक लक लक’ ही डीजेच्या तालावर वाजणारी गाणी आपली हिंदुधर्म संस्कृती, की पारंपरिक ढोलताशा पथकांचे वादन ही आपली संस्कृती…असे एक नव्हे अनेक प्रश्न समाज माध्यमांवर उपस्थित करत बुधवारी ढोलताशा पथकातील वादक, त्यांचे समर्थक, अनेक नागरिक यांनी फडके रस्त्यावर शिवसेना कल्याण लोकसभा आयोजित डीजेच्या कार्यक्रमावर टीकेची झोड उठवली होती. या माध्यमातून डीजे कार्यक्रमाचे आयोजक खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांना समाज माध्यमींनी टीकेचे लक्ष्य केले होते.
शिवसेना कल्याण लोकसभा आयोजित डीजेच्या फडके रस्त्यावरील कार्यक्रमामुळे ढोलताशा पथकांना या रस्त्यावर ढोलताशा वादनास पोलिसांनी परवानगी नाकारल्याची चर्चा ढोलताश पथक वादक, त्यांचे समर्थक, अनेक सामाजिक, धार्मिक संस्था चालकांमध्ये सुरू होती. दिवाळीच्या पहिल्या दिवशी, नववर्ष स्वागत यात्रेत ढोल ताशा पथकांना वादनाचा पूर्वीपासून पहिला मान मिळतो. ही सांस्कृतिक डोंबिवलीची परंपरा आहे. असे असताना यावेळी रामनगर पोलिसांनी प्रथमच फडके रोडवरील ढोलताशा पथकांमुळे चेंगराचेंगरी होण्याची भीती व्यक्त करून दिवाळीच्या पहिल्या दिवशी फडके रोड परिसरात ढोलताशा वादनास परवानगी नाकारली होती.
हेही वाचा – ‘फुकट फौजदारां’कडून महागड्या वस्तूंचा वापर, मुंबई उच्च न्यायालयाचे चौकशीचे आदेश
दिवाळीच्या पहिल्या दिवशी फडके रोडवर ढोलताशा वादन होत असल्याने डोंबिवली परिसरातील पथकांनी सुसज्ज तयारी केली होती. वादनातील पेहारावापासून ते ढोल, ताशा यांच्या देखभालीपासून वादन पथके आपली वादन कला फडके रस्त्यावर दाखविण्यास सज्ज झाली होती. रामनगर पोलिसांनी अचानक एक आदेश काढून गेल्या वर्षी ढोलताशा वादन पाहण्यासाठी प्रचंड गर्दी फडके रस्त्यावर झाली. यामुळे चेंगराचेंगरी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या प्रकारामुळे काही दुर्घटना, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत ढोलताशा वादनास परवानगी नाकारली होती. परंतु, वादनासाठी सज्ज ढोलताशा पथकातील कार्यकर्ते यामुळे नाराज झाले होते.
शिवसेना कल्याण लोकसभा आयोजित डीजे कार्यक्रमात अडथळा नको म्हणून राजकीय दबावातून पोलिसांनी ढोलताशा पथकांना वादनास बंदी घातली असल्याची चर्चा ढोलताशा पथकांमधील कार्यकर्ते, त्यांच्या समर्थकांमध्ये सुरू झाली होती. याविषयीची नाराजी त्यांनी उघडपणे समाज माध्यमांवर बुधवारी व्यक्त केली होती. या सर्व टीकेचा रोख शिवसेनेच्या आयोजक नेत्यांकडे होता. दहा दिवसांपूर्वी वाहतूक पोलिसांनी फडके रोडवर दिवाळीच्या पहिल्या दिवशी वाहतुकीला बंदी घालण्याचा आदेश काढला होता. त्यानंतर पोलिसांनी फडके रोडवर ढोलताशा बंदी घालणारा आदेश काढला. राजकीय दबावामधून हे प्रकार होत असल्याची चर्चा समाज माध्यमांमध्ये सुरू होती.
हेही वाचा – डोंबिवलीतील फडके रोडवर तरुणाईचा जल्लोष, विद्युत रोषणाईने फडके रोड झळाळला
राजकीय मंडळींचा पुढाकार
दिवाळीच्या दिवशी फडके रस्त्यावर ढोलताशा वादन ही पूर्वपरंपार प्रथा आहे. या प्रथेत खंड पडू नये म्हणून काही ढोलताशा पथकाच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. फडके रोडवर ढोलताशा वादनास परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. मंत्री चव्हाण यांनी केलेल्या हालचालीनंतर पोलिसांनी फडके छेद रस्त्यावरील टिळक रस्त्यावर ढोलताशा वादनास परवानगी देण्याचा निर्णय बुधवारी घेतला. या निर्णयामुळे ढोलताशा पथकांनी मंत्री रवींद्र चव्हाण, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे आणि समर्थकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे समाज माध्यमातून समाधान व्यक्त केले. ढोलताशा पथकांना बंदी असल्याची माहिती असल्याने अचानकच्या निर्णयामुळे काही पथके वादनात सहभागी झाली नव्हती. फडके रोडवर डीजेच्या दणदणाटबरोबर ढोलताशा पथकांचा कडकडाट सुरू झाला होता.
रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्याशी संपर्क झाला, पण वादनाच्या कडकडाटामुळे संवाद होऊ शकला नाही.
फडके रोड परिसरातील रस्त्यावर ढोलताशा वादनास कालच परवानगी मिळाली आहे. त्याप्रमाणे पथके वादन करत आहेत. – प्रथमेश जोगळेकर, ढोलताशा वादक