प्रशासकीय नियोजनामुळे २८ दिवसांत नव्या रुग्णांची नोंद नाही
पूर्वा साडविलकर
ठाणे : जिल्हातील शहरी भागांपाठोपाठ आता ग्रामीण भागांमध्येही करोनाचा संसर्ग ओसरू लागला असून जिल्ह्य़ातील ४३१ पैकी ११९ गावे करोनामुक्त झाल्याची बाब समोर आली. या सर्वच गावांमध्ये गेल्या २८ दिवसांत एकही रुग्ण आढळून आलेला नाही. गावपातळीवर करोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळेच हे शक्य झाल्याचा दावा जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे.
ठाणे जिल्ह्य़ामध्ये दुसऱ्या लाटेत शहरी तसेच ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग वाढला होता. कल्याण, भिवंडी, मुरबाड, अंबरनाथ आणि शहापूर या तालुक्यांतील ग्रामीण भागांमध्ये दररोज सरासरी शंभरच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. उपचारादरम्यान अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे गावकऱ्यांची चिंता वाढली होती. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामध्ये करोनाची लागण होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी याबाबत पथके गावोगावी जाऊन नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत. याशिवाय जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्या मदतीने गावातील नागरिकांचे ताप सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यामध्ये आढळून येणाऱ्या संशयित रुग्णांची करोना चाचणी केली जात आहे. या चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जात आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही करोना चाचणी केली जात आहे. तसेच करोना नियमांचे पालन करण्याचा संदेश पथके ध्वनिक्षेपकाद्वारे गावातील बोलीभाषेतून देत आहे.
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी गावे करोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून करोना चाचण्यांची संख्या वाढविली आहे. ताप सर्वेक्षण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. नागरिकांचे लसीकरण वेगाने करण्यावर भर देण्यात येत आहे. या सर्वाचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. जिल्ह्य़ातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड आणि शहापूर तालुक्यांतील ४३१ गावांपैकी ११९ गावे करोनामुक्त झाली आहेत. उर्वरित गावेही करोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली.
नागरिकांचे सर्वेक्षण
- ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात सद्य:स्थितीत १ हजार १५६ रुग्णांवर करोनाचे उपचार सुरू आहेत.
- त्यामध्ये अंबरनाथमधील ११७, कल्याणमधील २९१, भिवंडीमधील ३०८, शहापूरमधील ३७८ आणि मुरबाडमधील ६२ रुग्णांचा समावेश आहे.
- ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अंगणवाडी सेविका, आशा सेविका, शिक्षक तसेच आरोग्य सेवक असे ५९६ जणांचे पथक कार्यरत आहेत.
- या पथकाने आतापर्यंत ६५ हजार ४८६ घरांमधील २ लाख ९२ हजार ७०३ नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे.
एखाद्या गावात रुग्ण आढळून आल्यानंतर त्या गावामध्ये र्निजतुकीकरण करण्यात येते. तसेच त्या गावात दवंडी पिटवून नागरिकांना करोना नियमांचे पालन करण्याचा संदेश दिला जातो. शासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचे गावातील नागरिकांकडून काटेकोरपणे पालन केले जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी चाचणी, संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे आणि रुग्णांवर वेळेत उपचार करणे असा त्रिसूत्री कार्यक्रम आखून दिला असून त्याची योग्यरीत्या अंमलबजावणी केली जात आहे.
– चंद्रकांत पवार, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, ठाणे जिल्हा परिषद