स्वयंचलित यंत्रणेमुळे जास्त सौरऊर्जेची निर्मिती; ठाण्याच्या ‘चिल्ड्रन्स टेक सेंटर’चे संशोधन
आकाशात सूर्य जसजसा सरकत जातो त्याप्रमाणे सौर पॅनल्सही स्वयंचलित पद्धतीने सूर्याच्या दिशेने फिरू लागल्यास त्यातून पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिकची वीजनिर्मिती करता येऊ शकते. या कल्पनेतूनच ठाण्याच्या ‘चिल्ड्रन्स टेक सेंटर’च्या विद्यार्थ्यांनी ‘सोलर ट्रॅकिंग सिस्टीम’ या यंत्रणेची निर्मिती केली आहे. त्यामुळे पूर्वी केवळ एकाच कोनामध्ये कायमस्वरूपी बसवलेल्या पारंपरिक सौर पॅनल्सला स्वयंचलित पद्धतीने कार्यान्वित करून या विद्यार्थ्यांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यांच्या या यंत्रणेचा जनसामान्यांच्या घरामधील सौर पॅनल्समध्ये वापर व्हावा या दृष्टीने प्रयत्न सुरू असून डोंबिवलीतील एका उद्योजकाने या यंत्रणेची निर्मिती आणि विक्री करण्याची तयारीही दर्शवली आहे.
महापालिकेच्या पथदिव्यांसाठी असो किंवा घरगुती वापरासाठी गच्चीवर लावण्यात आलेले सौर पॅनल हे एकाच ठिकाणी कायमस्वरूपी बसवलेले असतात. सकाळी सूर्य उगवल्यानंतर त्यावर पडणारी सूर्यकिरणे साठवून ठेवण्यास हे पॅनल कार्यरत असले तरी दिवसभरात केवळ दोन तास या पॅनलवर मोठय़ा क्षमतेने थेट सूर्यप्रकाश पडतात. एकाच जागी कायमस्वरूपी बसवलेल्या या पॅनल्समुळे सौर पॅनलच्या एकूण क्षमतेपेक्षाही कैक पट कमी ऊर्जानिर्मिती होत असते. देशभरामध्ये सुरू असलेल्या अनेक सौरऊर्जेसंदर्भातील प्रकल्पांमध्येसुद्धा या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा अधुनिक बदल घडत नसल्याने अनेक सौर पॅनल अधिकची सौर ऊर्जानिर्मिती करण्यापासून वंचित राहत होते. अवघ्या काही व्ॉट ऊर्जेसाठीसुद्धा भले मोठे सौर पॅनल्स बसवावे लागत होते.
ही परिस्थिती बदलण्यासाठी ठाण्यातील ‘चिल्ड्रन्स टेक सेंटर’ संस्थेने २०१६ या वर्षांत सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यास प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून सौर ऊर्जेचा वापर होणाऱ्या यंत्रणेची निर्मिती केली जात असून त्या वेळी विद्यार्थ्यांनी ‘सोलर ट्रॅकिंग यंत्रणेची’ कल्पना संस्थेचे प्रमुख पुरुषोत्तम पाचपांडे यांच्याजवळ व्यक्त केली. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर ही यंत्रणा तयार करण्यात आली असून राज्य आणि राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनामध्ये या यंत्रणेचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. त्याचा वापर घरगुती वापरासाठी व्हावा या दृष्टीने संस्थेच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. व्यावसायिक कंपन्यांनी या यंत्रणेमध्ये स्वारस्य दाखवले असून यंत्रणेच्या निर्मितीची सुद्धा तयारी ‘चिल्ड्रन्स टेक सेंटर’कडे व्यक्त करण्यात आली आहे. ही यंत्रणा घरगुती वापरात आल्यास सौर ऊर्जेची निर्मिती क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने चांगला उपयोग होऊ शकतो.