Shilphata Road Traffic Updates : शिळफाटा रस्त्यावर जड, अवजड वाहनांना पाच दिवस बंदी घालण्यात आली आहे. राज्याच्या विविध भागातून डोंबिवली एमआयडीसीत कच्चा माल घेऊन येणारी वाहने बंदीमुळे दिलेल्या वेळेत कंपनीत येणार नसल्याने उत्पादन कसे करायचे आणि कंपनीत तयार झालेला पक्का माल बाहेर कसा पाठवयाचा, या विवंचनेत डोंबिवली एमआयडीसीतील उद्योजक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तसेच, डोंबिवली एमआयडीसीला कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. बहुतांशी उद्योजक खासगी पाणी पुरवठादारांकडून टँकरव्दारे पाणी विकत घेतात. या पाण्याचे टँकर शिळफाटा रस्त्याने धावतात. या रस्त्यावर वाहतूक कोंडी सुरू झाल्याने पाण्याचे टँकर ठरलेल्या वेळेत कंपनीत येत नाहीत. उत्पादनासाठी लागणारे पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने उत्पादित मालावर परिणाम झाला आहे, असे कंपनी चालकांनी सांगितले.

निळजे रेल्वे उड्डाण पुलावर रेल्वेकडून पुलाची पुनर्बांधणी होणार आहे. हा पूलही महत्वाचा आहे. त्यामुळे पाच दिवसांचा त्रास आम्ही आता सहन करू. हे काम कधीतरी करावेच लागणार होते. पावसाळ्याऐवजी ते आता होत आहे. हे पण महत्वाचे आहे, असे उद्योजकांनी सांगितले.

डोंबिवली एमआयडीसीतील काही कंपन्यांमध्ये उत्तर, दक्षिण भारतामधील उद्योजकांकडून कच्चा माल रस्ते मार्गाने आणला जातो. शिळफाटा रस्त्यावर सहा चाकी, १२, २४ चाकी जड, अवजड मालवाहू वाहनांना प्रवेश बंद आहे. त्यामुळे नवी मुंबई, पनवेल, रायगड परिसरातून डोंबिवली एमआयडीसीकडे येणाऱ्या वाहन चालकांसमोर मोठा प्रश्न पडला आहे. ही वाहने शिळफाटा रस्ता बंद असल्याने नवी मुंबई परिसरात खोळंबली आहेत. या वाहनांना आता मुंब्रा खारेगाव, भिवंडी बाह्यवळण रस्ता, दुर्गाडी पूल भागातून वळसा घेऊन डोंबिवलीत यावे लागेल. या वाहनांंना पत्रीपूल येथे वाहतूक पोलिसांनी अवजड वाहन म्हणून अडविले तर मोठी डोकेदुखी होणार आहे, असे उद्योजकांनी सांगितले.

एमआयडीसीतील काही कंपन्यांमध्ये पक्का माल तयार आहे. शिळफाटा रस्ता बंद असल्याने वाहन चालक हा पक्का माल अवजड वाहनात भरून इच्छित स्थळी जाण्यास तयार नाहीत. ही वाहने पर्यायी मार्गाने नेण्यासाठी वळसा घेऊन जावे लागणार असल्याने वाहन चालक पक्का माल वाहून नेण्यास तयार नाहीत, असे उद्योजकांनी सांगितले. समोरील खरेदीदारांनी पक्क्या मालाची नोंदणी केली आहे. माल वाहून नेण्यासाठी वाहन चालक तयार होत नसल्याने उद्योजकांची कोंडी झाली आहे.

शिळफाटा रस्त्यावर रेल्वे उड्डाण पूल बांधणीचे काम पाच दिवस केले जाणार आहे. या कामासाठी पाच दिवस शिळफाटा रस्त्यावर जड, अवजड वाहनांंना बंदी घालण्यात आल्याने डोंबिवली एमआयडीसीत विविध भागातून कच्चा माल घेऊन येणाऱ्या, घेऊन जाणाऱ्या वाहनांची कोंडी झाली आहे. यामुळे उद्योजक अडचणीत आले आहेत. – देवेन सोनी, उद्योजक, डोंंबिवली.