रमेश पाटील

वाडा तालुक्यातील २६ बस शिवसेनेच्या मेळाव्यासाठी आरक्षित; अनेक फेऱ्या रद्द

दादर येथे गुरुवारी विजया दशमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या दसरा मिळाव्यासाठी कार्यकर्त्यांना ये-जा करण्यासाठी एसटी महामंडळाच्या बस आरक्षित करण्यात आल्या होत्या. वाडा आगारामधून २६ बस मेळाव्यासाठी आरक्षित केल्याने १५० फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्याचा मोठा फटका ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रवाशांना बसला. अनेकांना तर खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागला.

वाडा एसटी बस आगारात सध्या ४२ बसगाडय़ा असून जिल्ह्यातील ग्रामीण भागात जाण्यासाठी अनेक फेऱ्या आहेत. मात्र शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी २६ बस आरक्षित केल्याने दीडशे फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. केवळ १६ बसच राहिल्याने एसटीचे वेळापत्रक बिघडले आणि त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागला.

पालघर जिल्ह्यातही पालघर, बोईसर, जव्हार, सफाळा, डहाणू या आगारांमधूनही अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्याने ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवशांना मोठा फटका बसला. विलंबाने बसगाडय़ा येत असल्याने वाडय़ांची प्रतीक्षा करण्याशिवाय दुसरा पर्याय प्रवाशांकडे नव्हता. विशेष म्हणजे याबाबतची कोणतीच माहिती प्रवाशांना देण्यात आली नाही. अचानक फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. अनेक प्रवाशांवर खासगी वाहनांचा आसरा घेण्याची वेळ आल्याने एसटी महामंडळाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

एका महत्त्वाच्या कामानिमित्त वाडा येथे आली होते. मात्र परत येण्यासाठी तीन तास बस स्थानकात थांबूनही बस मिळाली नाही, अखेर खाजगी वाहनाने घरी परतावे लागले.

– भावना पाटील, महिला प्रवासी

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला जाण्यासाठी खासगी बससुद्धा वापरता आल्या असत्या, पण मोठय़ा संख्येने ग्रामीण भागातील रहिवाशांचा आसरा असलेल्या एसटी बस वापरण्यात आल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. परिवहन मंत्र्यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त करावी.

– देवेंद्र भानुशाली, प्रवासी