ठाणे : भिवंडी येथील झाटेपाडा भागात वृद्धेची गळा चिरून हत्या करत तिच्या घरातील दागिने चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अभिमन्यू गुप्ता याला अटक केली आहे. वृद्धेची हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचे घर जाळण्याचाही प्रयत्न गुप्ता याने केला होता. अभिमन्यू याला ऑनलाईन जुगाराचे व्यसन होते. त्यामुळे कर्ज झाल्याने त्याने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे.
झाटेपाडा येथील गावात सेल्वाममेरी नाडर या वयोवृद्ध महिला एकट्या राहात होत्या. १४ ऑगस्टला त्यांचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. तसेच, त्यांच्या घरातील दागिन्यांची चोरी झाली होती. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणातील आरोपी हा ठाण्यातील कापूरबावडी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून अभिमन्यू गुप्ता याला अटक केली. त्याची चौकशी केली असता, ऑनलाईन जुगार खेळण्यासाठी त्याने अनेकांकडून पैसे घेतले होते. त्यामुळे त्याच्यावर एक ते दीड लाख रुपयांचे कर्ज झाले होते. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने चोरी केली. तसेच महिलेची गळा चिरून हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने घराला आग लावण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती समोर आली आहे.