ठाणे: सातत्याने रुळ ओलांडताना अपघात होत असल्याने दिवा रेल्वे स्थानकाचे नाव अधिक अपघात होणाऱ्या रेल्वे स्थानकांच्या यादीत येत होते. या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि नागरिकांनी रेल्वे फाटक ओलांडू नये यासाठी स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूला सरकते जिने बसविण्यात आले होते. तर प्रवाशांना उडी मारून बाहेर जाता येऊ नये यासाठी आठही फलाटांवर रेल्वे पोलिसांनी बॅरीकेडींग केली आहे. याचेच फलित म्हणून गेल्या एक महिन्यात दिवा रेल्वे स्थानकातील फाटक ओलांडताना एकही प्रवाशाचा मृत्यू झाला नसल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे.
मध्य रेल्वेवरील स्थानकांमध्ये ठाणे, डोंबिवली या स्थानकांबरोबरच दिवा स्थानक हे कायम गर्दीने गजबजलेल्या स्थानकांपैकी एक आहे. या स्थानकातून शहराच्या पूर्वेला जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. मात्र स्थानकाला शहराच्या पूर्व भागाला जोडणाऱ्या पुलावर केवळ दोनच अरुंद जिने असल्याने तिथे कायम चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण होत असते. यामुळे बहुतेक प्रवासी थेट रेल्वे रुळ ओलांडून प्रवास करतात. त्यामुळे आतापर्यंत अनेक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर मागील महिन्यात दिवा स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला प्रवाशांना स्थनकात थेट येता यावे आणि बाहेर पडता यावे साठी सरकते जिने बसविण्यात आले होते.
हेही वाचा… कल्याणमधील ठाकरे समर्थक शिवसैनिकाच्या विजय तरुण मंडळाला पोलिसांची नोटीस
प्रवासी संघटनेच्या मागणीनुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून सरकते जिने बसविले आहेत. मागील एक महिन्यापूर्वी याचे लोकार्पण झाले होते. या सरकत्या जिन्यांचे लोकार्पण केल्यानंतर रेल्वे फाटक प्रवाशांच्या रहदरीसाठी पूर्णतः बंद करण्याचे निर्देश रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांनी दिले होते. तसेच सर्व फलाटांवर पोलिसांनी बॅरीकेडींग केली आहे. यानुसार १७ ऑगस्ट २०२३ पासून रेल्वे रूळ ओलांडणे पूर्णतः बंद झाल्यामुळे दिवा रेल्वे स्थानकात महिनाभरात रेल्वे रूळ ओलांडताना एकही अपघात झाला नाही. प्रवाशांना सरकत्या जिन्याचा पर्याय मिळाल्याने इतर अरुंद जिन्यांवरील गर्दीही कमी झाली आहे.
हेही वाचा… कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात लवकरच दहा विद्युत बस
२०२२ मध्ये रेल्वे रुळ ओलांडताना १७१ प्रवाशांनी प्राण गमावले आहेत. २०२३ मध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत ११० प्रवाशांनी दिवा रेल्वे स्थानकात झालेल्या अपघातांमध्ये आपला जीव गमावला आहे. तर केवळ जुलै २०२३ या एक महिन्यात तब्बल २१ प्रवाशांचा दिवा रेल्वे स्थानकात अपघाती मृत्यू झाला आहे. या सर्व अपघातांचे मुख्य कारण हे रेल्वे रुळ ओलांडून प्रवास करणे होते.
प्रतिक्रिया
दिवा रेल्वे स्थानकात पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही दिशांना चढणारे आणि उतरणारे असे प्रत्येकी २ सरकते जिने बसवण्यात आले आहेत. हे जिने दोन्ही पुलांना जोडण्यात आले असून सोबतच आठही प्लॅटफॉर्मवरून खाली उतरता येऊ नये यासाठी बॅरिकेडिंग केले आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे गेटकडे जाताच येणार नाही. तरीही एखादा प्रवासी रुळात आल्यास २४ तास रेल्वे पोलिसांची गस्त असून त्याच्यावर कारवाई केली जात आहे. या उपाययोजनांमुळे गेल्या एक महिन्यात दिवा रेल्वे स्थानकात एकही अपघात झालेला नाही. – डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे