ठाणे – मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका हा मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे गाड्यांना बसत आहे. मुसळधार पावसामुळे कर्जत हून मुंबईच्या दिशेने जाणारी उपनगरीय रेल्वे गाड्यांची वाहतूक ही सुमारे २० ते २५ मिनिट उशिराने होत आहे. तर मुंबईहून कर्जतच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या देखील १० ते १५ मिनिट उशिराने स्थानकांवर पोहचत आहेत. यामुळे प्रवाशांना कामाच्या ठिकाणी पोहचण्यास उशीर होत आहे.
मुंबई , ठाणे तसेच इतर उपनगरांमध्ये सोमवार रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. तर मंगळवार सकाळपासूनच मुसळधार पावसाने मुंबईत हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसामुळे मध्यरेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. कर्जत, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण – डोंबिवली या शहरांतून दररोज लाखो प्रवासी
मुंबई आणि ठाणे यांसारख्या शहरांमध्ये उपनगरीय रेल्वे गाड्यांनी प्रवास करतात. तर डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती असल्याने मुंबई आणि ठाणे येथून एक मोठा कामगार वर्ग या शहरांमध्ये दररोज कामानिमित्त येतो. मध्य रेल्वेचा वाहतुकीच्या वेग मंदावल्याने या सर्व प्रवाशांना आपल्या कामाच्या ठिकाणी पोहचण्यास उशीर होत आहे. तसेच उशिराने धावणाऱ्या लोकलमुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे आधीच कार्यालयात पोहचण्यासाठी होणारा उशीर आणि त्यात गर्दीने भरलेल्या गाड्या या मुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. कर्जतहून मुंबईच्या दिशेने सकाळी ७ ते १० वाजण्याच्या दरम्यान निघालेल्या गाड्या या ठाणे स्थानकापर्यंत वेळेत पोहचल्या. ठाणे आणि पुढील शहरांमध्ये मुसळधार पाऊस असल्याने मुंबईला पोहचण्यास या गाड्यांना उशीर झाला. या विलंबाचा फटका सकाळी १० ते ११ नंतर कर्जतहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे गाड्यांना बसला आहे. अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.