बदलापूर : गेल्या काही दिवसांपासून बारवी धरण क्षेत्रात पडणाऱ्या समाधानकारक पावसामुळे बारवी धरण आपल्या क्षमतेच्या ५० टक्के भरले आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला हा पाणीसाठा अवघा ३० टक्क्यांवर आला होता. मात्र गेल्या पंधरा दिवसात चांगला पाऊस पडल्याने वेगाने धरणाची पाणी पातळी वाढली आहे. असाच पाऊस कायम राहिल्यास जुलै अखेरीस बारावी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची आशा आहे. त्यामुळे पाण्याच्या ठाणे जिल्ह्याने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने ठाणे जिल्ह्यातील प्रमुख जलस्त्रोत असलेल्या बारावी धरणाचा पाणीसाठा खालावला होता. जून महिन्याच्या अखेरीस दोन दिवस पावसाने हजेरी लावली. तर जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून बारवी धारण क्षेत्रात चांगला पाऊस पडतो आहे. त्यामुळे जून महिन्यात ३० टक्क्यांवर आलेला पाणीसाठा आता ५० टक्क्यांवर आलेला आहे. बुधवारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार बारावी धरण आपल्या क्षमतेच्या निम्मे भरले आहे.
सध्या बारवी धरणात १७० दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. गेल्या २४ तासात बारवी धरणात ६३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत बारावी धरणात ८६४ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. बारवी धरण क्षेत्रात कमी पाऊस झाला असला तरी मुरबाड आणि कर्जत तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने बारावी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होते आहे. त्यामुळे बारावी धरणामधील पाण्याने ६५ मीटर इतकी उंची गाठली आहे. सध्या सुरू असलेला पाऊस कायम राहिल्यास जुलैअखेरीस बारावी धरण भरण्याची आशा आहे. जून महिन्याच्या अखेरीस पाणीटंचाईचे असलेले संकट आता काही अंशी दूर झाल्याचे दिसते आहे. त्यामुळे पाण्याच्या बाबतीत ठाणे जिल्ह्याने सुटकेचा निश्वास सोडला आहे.