लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण : रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातील उल्हास खोरे आणि ठाणे जिल्ह्यातील सह्याद्री डोंगरांच्या रांगेत रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे या खोऱ्यातून वाहणाऱ्या उल्हास, भातसा, काळू, भारंगी नद्यांच्या पाणी पातळीत रविवारी रात्री पासून वाढ झाली आहे.

कल्याण-डोंबिवली शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या मोहिली, मोहने येथील पाणी पुरवठा केंद्रांच्या समतल पाण्याची पातळी वाढली आहे. मोहने ते टिटवाळा परिसर जोडणाऱ्या उड्डाण पुलाच्या कठड्यांना पाणी लागले आहे. पुलावरून पाणी वाहून जाण्यासाठी एक ते दीड फुटाची उंची बाकी आहे. पाण्याच्या पातळीमुळे टिटवाळा भागातील सावरकर नगर भागातील वस्तीत रात्रीपासून पाणी घुसले आहे. हा परिसर नद्यांच्या समतल पातळीत येतो. रात्रीपासून रहिवासी घरातील पाणी उपसण्यासाठी व्यस्त आहेत.

आणखी वाचा-ठाणे बाजारपेठेतील ८० वर्ष जुन्या इमारतीचा भाग कोसळला

सतत मसुळधार पाऊस सुरू राहिला तर कल्याणमधील दुर्गाडी परिसरातील बाजारपेठ, बैलबाजार भागात पाणी घुसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे खाडी किनारच्या रहिवाशांनी स्थलांतराची, तबेले चालकांनी सावध राहून पाणी पातळी वाढील तर तबेल्यातून म्हशी बाहेर काढण्याची तयारी सुरू केली आहे. मुसळधार पावसामुळे पालिकेच्या आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

माहुली किल्ला परिसरा रात्रभर मुसळधार पाऊस पडल्याने सावरोली, शहापूर भागातून वाहणारी भारंगी नदी दुथढी वाहत आहेत. या नदी किनाऱ्याच्या वस्तीत पाणी शिरले आहे. अनेकांची वाहने पाण्याखाली गेली आहेत. तर काहींच्या दुचाकी वाहून गेल्या आहेत. भातसा, काळू नद्यांच्या पात्रात वाढ झाला आहे. या मुसळधार पावसामुळे भात लागवडीच्या कामांना वेग आला आहे.

रविवार सकाळपासून पावसाने उसंत घेतल्याने नद्यांच्या पाण्याच्या पातळीत घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शहापूर तालुक्यातील भातसा, तानसा, वैतरणा, अप्पर वैतरणा, मोडकसागर या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला नसल्याने धरणांची तळ गाठला आहे. या धरणांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. धरणांमध्ये पाणी नसल्याने सध्या मृत साठ्यांमधून शहराला पाणी पुरवठा केला जातो.

आणखी वाचा-शिळफाटा रस्त्याची खड्डे खोदून नासधूस केल्याने २७ गावातील युवा पदाधिकाऱ्यांवर गुन्हे

रेल्वे मार्गांवर अडथळे

मध्य रेल्वेच्या कसारा ते आसनगाव रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रेल्वे मार्गावर झाड कोसळले होते. ते कर्मचाऱ्यांनी बाहेर काढून या रेल्वे मार्गावरील वाहूतूक सुरळीत केली. वासिंद आणि खडवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान डोंगराच्या खचलेल्या मातीचा भाग रेल्वे रूळावर येऊन पडला होता. त्यामुळे रेल्वे रूळ ढिगाऱ्याखाली गेला होता. रेल्वे कामगारांनी तातडीने घटनास्थळी येऊन या रूळावरील चिखलमय मातीचा ढीग बाजुला काढला. कल्याण ते आसनगाव रेल्वे स्थानकांच्या दरम्यान तिसऱ्या, चौथ्या रेल्वे मार्गिकेचे काम सुरू आहे. या कामामुळे डोंगरभागात खोदकाम करण्यात आले आहे. हा खोदलेला भाग पावसाळ्यात खचून तो रेल्वे मार्गात मातीसकट वाहून येत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to heavy rains in ulhas valley water level of ulhas bhatsa bharangi kalu rivers has increased mrj
Show comments