बदलापूर: गेल्या २४ तासात झालेल्या जोरदार पावसामुळे ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात एकच दिवसात तब्बल ३२ दशलक्ष घन मिटर पाण्याची भर पडली आहे. बुधवारी सकाळी बारवी धरणात १५७.६८ दशलक्ष घन मिटर पाणी साठा होता. तर गुरुवारी त्यात मोठी भर पडल्याने पाणी साठा थेट १८९.२५ दशलक्ष घन मिटर पोहोचला आहे. त्यामुळे धरणात सध्याच्या घडीला ५६ टक्के पाणीसाठा झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील बहुतांश महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती आणि औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या धरणातील पाणीसाठा एकूणच जिल्ह्याच्या व्यवस्थापनासाठी महत्त्वाचा आहे. यंदाच्या वर्षात बारवी धरणाची पाणी पातळी खालावली होती. त्यामुळे जून महिन्यापासून जिल्ह्यात दर पंधरा दिवसांनी एक दिवस पाणी कपात केली जात होती. मात्र जून महिन्याच्या अखेरीस पावसाने हजेरी लावल्याने दिलासा मिळाला होता. पाऊस पडत असला तरी बारवी धरणाची पाणी पातळी संथगतीने वाढत होती. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार मंगळवारपासून जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली.

हेही वाचा >>>ठाण्यात चोवीस तासात २१४ मिमी पावसाची नोंद, यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पाऊस

बुधवारी २४ तासांच्या कालावधीत बारवी धरणक्षेत्रात मोठा पाऊस झाला. एका दिवसात बारवी धरणात तब्बल ३२ दशलक्ष घनमीटर पाण्याची भर पडली आहे. बुधवारी बारवी धरणात ४६ टक्के पाणीसाठा होता तर धरणात १५७.६८ दशलक्ष घनमीटर पाणी होते. गुरुवारी बारावी धरण क्षेत्रात २७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे बारावीचा पाणीसाठा ४६ टक्क्यांवरून थेट ५६ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्याच्या घडीला धरणात १८९.२५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्याची जलचिंता काही अंशी मिटली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to heavy rains the barvi dam which supplies water to thane district overflowed in a single day amy