डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाची इमारत पाच वर्षापूर्वी धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आली आहे. या इमारतीमधील कार्यालये डोंबिवलीतील इतर भागात सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे कर्मचारीमुक्त असलेल्या या इमारतीची आता देखभाल होत नसल्याने या इमारतीच्या पाठीमागील अडगळींच्या जागेत कचऱ्याचे ढीग साचले आहेत.
या ढिगांवर दिवसा, रात्री उंदरांचा राबता असतो. रात्रीच्या वेळेत मद्यपी, गर्दुल्ले याठिकाणी येऊन बसतात. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरात हा भाग येतो. त्यामुळे टाकाऊ वस्तू याठिकाणी फेकून दिल्या जातात. धोकादायक म्हणून या इमारतीकडे पालिकेचे लक्ष नाही. यापूर्वी या इमारतीत पालिकेचे ग आणि फ प्रभाग कार्यालये असायची. सतत कर्मचाऱ्यांची वर्दळ असायची. त्यामुळे पालिकेच्या आतील, बाहेरील भागाची नियमित स्वच्छता केली जात होती.
आता या इमारतीत कर्मचारी नसल्याने या इमारतीचा कोंडवडा झाला आहे. इमारतीत धुळीचे थर साचले आहेत. दस्तऐवज अस्ताव्यस्त पडले आहेत. त्यावर धूळ साचली आहे. बाहेरील भागात कचऱ्यावर घुशी, उंदीर यांचा वावर आहे. याठिकाणी सतत असते. या इमारतीच्या इंदिरानगर चौक भागात स्वामी विवेकानंद, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आहेत. इंदिरा चौक दिशेकडून पालिका इमारतीचा भाग रस्त्यावर येतो. या इमारतीच्या बाजुला रिक्षा वाहनतळ आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेत या भागातील पदपथ, मोकळ्या जागेत अनेक गैरप्रकार चालतात. मद्यपी, गर्दुल्ले याठिकाणी तळ ठोकून असतात. तंबाखू, पान खाऊन हा भाग लालभडक करण्यात आला आहे.
पालिकेत नियमित राष्ट्रपुरूषांचे स्मरण केले जाते. त्याच बरोबर पालिकेच्या डोंबिवली इमारतीशी संबंधित अधिकाऱ्यांनी ही इमारत धोकादायक स्थितीत उभी असली तरी त्याच्या आजुबाजुला स्वच्छता राहील याची काळजी घ्यावी. राष्ट्रपुरूषांचे पुतळे आणि त्याच्या बाजुला कचऱ्याची घाण, दुर्गंधी पाहून याविषयी अनेक जाणकार नागरिक याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. स्वामी विवेकानंद, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असली की त्या दिवशी पालिकेच्या इमारती जवळचा परिसर पालिका सफाई कामगारांकडून स्वच्छ केला जातो. ही सफाई नियमित ठेवण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.