डोंबिवली : आतापर्यंत खड्डे, मुसळधार पावसाच्या त्रासातून सुटका झालेली नसताना डोंबिवलीतील प्रवासी, विद्यार्थ्यांना मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवरील छेद रस्ते, अरुंद रस्ते आणि पालिकेच्या कचरा वाहू वाहनांचे मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरील ठाण याचा त्रास होऊ लागला आहे. या नव्या डोकेदुखीने डोंबिवलीतील प्रवासी हैराण आहे.डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी वाहतूक विभागाचे प्रयत्न सुरू असताना, पालिकेच्या घनकचरा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या कचरा वाहू दोन मोठ्या गाड्या दररोज पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालया जवळील आणि के. बी. विरा शाळे समोरील अरुंद रस्त्यावर आणून उभ्या केल्या जातात. या मोठ्या वाहनांमध्ये परिसरातील प्रभागांमध्ये घंटागाडीतून जमा होणारा कचरा आणून टाकला जातो.
विरा शाळेसमोरील अरुंद रस्त्यावर मोठी कचरा वाहू वाहने उभी करण्यात येत असल्याने याठिकाणी दररोज संध्याकाळी पाच नंतर वाहतूक कोंडी होते. या रस्त्यावर रिक्षा वाहनतळ आहे. कचरा वाहू वाहनांमुळे रिक्षांची रांग मुख्य रस्त्यावर येते. त्यामुळे या रस्त्यावरुन येजा करणारी वाहने कोंडीत अडकतात, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत.संध्याकाळी विरा शाळा सुटण्यापूर्वी अनेक रिक्षा चालक, पालक आपली वाहने घेऊन विरा शाळे समोरील रस्त्यावर येतात. त्यांना या कोंडीचा सर्वाधिक फटका बसतो. शिळफाटा मानपाडा रस्त्याने येणारी बहुतांशी वाहने विरा शाळा रस्त्याने फडके, नेहरु रस्त्याने डोंबिवली पश्चिमेत जातात. पश्चिमेकडून येणारी वाहने नेहरू रस्त्यावरुन विरा शाळेसमोरील अरुंद रस्त्यावरुन इच्छित स्थळी जातात. या वाहनांना कचरा वाहू मोठ्या वाहनांचा अडथळा येतो.
हेही वाचा : अंबरनाथ : रिव्हर्स घेताना विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी शाळेची बस उलटली आणि…
परिसरातून घंटागाड्या कचरा घेऊन आल्या की त्या गाड्या या रस्त्यावर उभ्या केल्या जातात. त्यामुळेही कोंडीत आणखी भर पडते, असे या रस्त्यावरील समोरील इमारतीत राहणारे रहिवासी मनोज मेहता यांनी सांगितले. एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले कचरा वाहू वाहनांमध्ये घंटागाड्यांमधून येणारा कचरा टाकला जातो. तो कचरा कचराभूमीवर नेला जाता. यासाठी विरा शाळेचा रस्ता ही मध्यवर्ति जागा आहे. त्यामुळे येथे वाहने उभी केली जातात.
ठाकुर्लीत कोंडी कायम
ठाकुर्ली पूर्व भागात हनुमान मंदिर रस्त्यावर सकाळ पासून ते रात्री उशिरापर्यंत अरुंद रस्त्यामुळे सतत वाहन कोंडी होत असल्याने प्रवासी हैराण आहेत. शाळेच्या बस, अवजड ट्रक याच रस्त्यावरुन येजा करतात. अवजड वाहनांना या रस्त्यावरुन बंदी केली तर ही कोंडी होणार नाही. यासाठी वाहतूक अधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. या रस्त्यावर गेल्या तीन महिन्यापासून खड्डे पडले आहेत. पालिकेने वेळोवेळी ते बुजविले. सततच्या वाहनांच्या वर्दळीमुळे ते उखडतात. कल्याण, डोंबिवली, एमआयडीसीतून येणारी वाहने या रस्त्यावरुन येजा करतात.कल्याण मधील मुरबाड रस्त्यावरील छेद रस्ते, डोंबिवलीतील मानपाडा रस्त्यावरील छेद रस्त्यांवरुन वाहनांची संख्या वाढल्याने या रस्त्यावर छेद रस्त्यावरुन वाहने आले की मुख्य रस्त्यावरील वाहने खोळंबून राहतात. त्यामुळे वाहन कोंडी होती. मानपाडा रस्त्यावर शिवाजीनगर, सागाव भागात, मुरबाड रस्त्यावर रामबाग भागात अशाप्रकारची सर्वाधिक कोंडी होते, असे प्रवाशांनी सांगितले.