ठाणे: रेल्वे स्थानकात पुर्व आणि पश्चिम भागाला जोडण्यासाठी दोन पादचारी पुलांची उभारणी गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत आहे. परंतु या कामासाठी ठाणे महापालिकेडून वेळेवर निधी उपलब्ध होत नसल्याने पुलाचे काम रखडले आहे. डिसेंबर महिनाअखेरपर्यंत पुलाची कामे उरकून ते प्रवाशांसाठी खुले केले जाणार होते. पण, काम रखडल्याने या पुलांसाठी आणखी तीन महिने प्रतिक्षा करावी लागणार आहे. शिवाय, कल्याण दिशेकडील पुलाचे काम रखडलेले असतानाच, त्याशेजारी असलेला पादचारी पुल धोकादायक झाल्याने तो बंद करण्यात आला असून यामुळे प्रवाशांना वळसा घालून प्रवास करावा लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे रेल्वे स्थानकात सहा पैकी चार पादचारी पूल हे रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. त्यातील दोन पुल ठाणे पूर्व आणि पश्चिमेला जोडणारे आहेत. ठाणे पूर्व भागात राहणाऱ्या नागरिकांना पश्चिमेकडे येण्यासाठी हे पुल बांधण्यात आले आहेत. यातील एक पुल कल्याणच्या दिशेला आहे. तर दुसरा पुल मुंबईच्या दिशेला आहे. या पुलांची देखभाल दुरूस्ती ठाणे महापालिकेच्या निधीतून रेल्वे प्रशासन करत असते. ठाणे पूर्वेकडील कोपरी, चेंदणी कोळीवाडा, अष्टविनायक चौक भागात राहणारे हजारो नागरिकांना अनेकदा कामानिमित्ताने ठाणे पश्चिम भागात जाण्यासाठी रेल्वे पुलाचा वापर करतात. त्यामुळे हे दोन्ही पुल येथील नागरिकांच्या प्रवासासाठी महत्त्वाचे आहेत. हे पुल जीर्ण आणि धोकादायक झाल्याने ते पाडून त्या जागी नवीन पुल उभारणी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला.

हेही वाचा… ठाणे स्थानक परिसरात रिक्षाचालक अडवितात प्रवाशांची वाट; वाहतूक पोलिसांसमोरच रिक्षाचालकांचा उपद्रव

शिवाय, पारसिक बोगदा परिसरातही एक पादचारी पूल उभारण्यात येत आहे. अशाप्रकारे एकूण तीन पादचारी पूलांची उभारणी केली जात आहे. या पुलांच्या कामासाठी २४ कोटी ९० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा निधी देण्याची मागणी रेल्वे प्रशासनाने ठाणे महापालिकेकडे केली होती. यानंतर पालिकेने आठ कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात उपलब्ध करून दिला होता. हा निधी मिळताच तीन वर्षांपुर्वी मुंबई दिशेकडील पादचारी पूल पाडून त्या जागी नवीन पुलाची उभारणीचे काम सुरू करण्यात आले. त्याचबरोबर कल्याण दिशेकडील जुन्या पादचारी पुलाशेजारीच नवीन पुलाच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आले होते.

करोनाकाळात उत्पन्न वसुलीवर परिणाम होऊन जमा-खर्चाचे गणित बिघडल्यामुळे ठाणे महापालिकेने दुसऱ्या टप्प्यातील निधी दिला नव्हता. करोना काळानंतर आर्थिक परिस्थिती रुळावर येताच पालिकेने चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. यानंतर पुलांची रखडलेली कामे पुन्हा सुरू झाली. मुंबईकडील पादचारी पूलाच्या शेडचे, संरक्षित कठडे, फरशी बसविणे अशी कामे शिल्लक आहेत. कल्याण दिशेकडील पुलाचे खांबच केवळ उभारण्यात आलेले आहेत. पालिकेकडून तिसऱ्या टप्प्यातील निधी उपलब्ध झालेला नसल्यामुळे ही कामे पुन्हा रखडल्याचे चित्र आहे. महापालिकेने निधी उपलब्ध केल्यास तीन महिन्यात दोन्ही पादचारी पूल उभे करू असा दावा रेल्वेने केला आहे.

पुलाच्या कामाचा खर्च वाढला

ठाणे रेल्वे स्थानकात मुंबई आणि कल्याण दिशेकडे दोन पुल, पारसिक बोगदा येथे एक पुल अशा एकूण तीन पादचारी पूलांची उभारणी केली जात आहे. या पुलांच्या कामासाठी २४ कोटी ९० लाख रुपयांचा खर्च सुरुवातीला अपेक्षित होता. परंतु पुलांची कामे लांबल्यामुळे या खर्चातही आता वाढ झाली आहे. या पुलांच्या कामाच्या खर्चात तीन कोटींची वाढ होऊन तो २७ कोटी ६३ लाख रुपये इतका झाला आहे.

येत्या काही दिवसांत रेल्वे प्रशासनाला पाच कोटी रूपये उपलब्ध करून देणार आहे. उर्वरित निधीही लवकरच उपलब्ध करून दिला जाईल. – धनंजय मोदे, कार्यकारी अभियंता, ठाणे महापालिका

ठाणे स्थानकातील कल्याण दिशेकडील पूल बंद झाल्याने कोपरी, चेंदणी कोळीवाडा भागातील नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी असंतोष निर्माण झाला आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य रेल्वे प्रबंधक रजनीश गोयल यांची भेट घेऊन त्यांना पुलाचे महत्त्व पटवून दिले आहे. महापालिकेकडून निधी उपलब्ध झाला नसल्याने पुलांची कामे रखडली आहे. निधी अभावी कामे थांबवू नका अशा सूचना त्यांना केल्या आहेत. तसेच ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडेही निधी उपलब्धते संदर्भात पत्रव्यवहार केला आहे. – राजन विचारे, खासदार, ठाणे लोकसभा.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to non availability of funds the work of constructing the pedestrian bridge has been stopped inconvenience to railway passengers in thane dvr
Show comments