भगवान मंडलिक, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण: मुंबई-नाशिक महामार्गावर ठाणे ते शहापूर दरम्यानच्या २२ किलोमीटर रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. शहापूर, आसनगाव दरम्यान महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून रस्त्यांची कामे सुरू आहेत. या रस्त्यावरुनचा प्रवास सततच्या वाहन कोंडीमुळे जीवघेणा ठरत आहे. या कोंडीतून मुक्तता करण्यासाठी अवजड वाहन चालक महामार्गालगतच्या गावांमधील अंतर्गत रस्त्यावरुन शिळफाटा दिशेने प्रवास करत आहेत. विविध भागातील अंतर्गत रस्त्यांवरुन येणाऱ्या अवजड वाहनांमुळे शिळफाटा रस्ता कोंडीच्या विळख्यात अडकत आहे.

शिळफाटा रस्त्याचा पलावा चौक, काटई ते खिडकाळी दरम्यानचा भाग वगळला तर उर्वरित रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडीला मागील आठ ते नऊ महिन्यांपासून पूर्ण विराम मिळाला आहे. मुसळधार पाऊस पडूनही या रस्त्यावर काँक्रीटीकरणामुळे खड्डे न पडल्याने यावेळी वाहतूक सुरळीत होती.

हेही वाचा… कल्याण-डोंबिवलीतील रस्ते गणेशोत्सवापूर्वी सुस्थितीत करा, पालिका आयुक्तांचे आदेश

गेल्या काही दिवसांपासून शिळफाटा रस्ता सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडीने गजबजलेला असतो. या रस्त्यावरुन मोटारींबरोबर, जड, अवजड वाहतूक सुरू असते. अचानक शिळफाटा रस्ता सतत कोंडीने गजबजू लागल्याने कोळसेवाडी, डायघर वाहतूक पोलिसांची कोंडी सोडविताना दमछाक होत आहे.

शिळफाटा रस्त्यावर पुणे, नवी मुंबई, जेएनपीटी, मुंबईकडून येणारी वाहतूक असते. या वाहतुकीत आता मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे, कोंडीतून मुक्तता होण्यासाठी अवजड वाहन चालक शहापूर, मुरबाड, कर्जत गावांमधील अंतर्गत रस्त्यांवरुन शिळफाटा दिशेने येतात. येथून इच्छित स्थळी येजा करतात. पुणे, पनवेलकडे येऊन गुजरात, नाशिकडे जाणारा वाहन चालक शिळफाटा, कल्याणमधून पडघा रस्त्याने किंवा सरळगाव, बदलापूर, मुरबाडमार्गे इच्छित स्थळी जातो, असे एका वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा… बदलापूर, अंबरनाथमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न; नवे उड्डाणपूल प्रस्तावित

मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर, वासिंद, पडघा, भिवंडी ते ठाणे दरम्यानच्या खड्ड्यांमुळे होणाऱ्या कोंडीतून मुक्तता होण्यासाठी नाशिककडून येणारे वाहन चालक शहापूर येथे वळण घेऊन किन्हवली, सरळगाव, कल्याण मार्गे शिळफाटा दिशेने जातात, या अवजड वाहनांमुळे गावांमधील राज्य, जिल्हा परिषदेच्या अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. अहमदनगर भागातून येणारे वाहन चालक रायगड भागात जाण्यासाठी माळशेज, मुरबाड घाटमार्गे येऊन शिळफाटा मार्गे इच्छित स्थळी जातात. खड्डेमय रस्ते चुकविण्यासाठी वाहन चालक गावांमधील अंतर्गत सुस्थितीत रस्त्यांचा वापर करतात. ही वाहने एकाचवेळी शिळफाटा रस्त्यावर येत असल्याने शिळफाटा रस्त्यावर वाहन कोंडी होत आहे, असे एका वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा… वेळेत उपचार मिळाले नसल्याने शहापूरमध्ये आठ वर्षीय मुलाचा मृत्यू?

रायगड, नवी मुंबई, जेएनपीटी भागातून नाशिक, गुजरात, उत्तर प्रदेशकडे जाणारा वाहन चालक मुंब्रा, कळवामार्गे न जाता खड्डे चुकविण्यासाठी तो शिळफाटा, कल्याण, मुरबाड, पडघा, भिवंडीमार्गे इच्छित स्थळी जातो. शिळफाटा रस्त्यावर शिरकाव करणाऱ्या या चुकारू वाहनांमुळे या रस्त्यावरुन नियमित प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गाला सर्वाधिक फटका बसत आहे.

“मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे चुकविण्यासाठी वाहन चालक शिळफाटा रस्त्यावरुन इच्छित स्थळी जात आहेत. त्यामुळे शिळफाटा रस्त्यावरील वाहन भार वाढल्याने वाहन कोंडी दिसत आहे.” – रवींद्र क्षीरसागर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोळसेवाडी वातूक विभाग, कल्याण.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to potholes on nashik highway heavy vehicles choose roads around shilphata results in traffic jam dvr
Show comments