बदलापूर : कायमच वीज समस्यांनी त्रस्त असलेल्या ग्रामीण जनतेला काही वर्षांपूर्वी अखंडीत वीज पुरवठ्याचे स्वप्न दाखवण्यात आले. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. बदलापुरजवळच्या वांगणी, काराव, अंबरनाथ तालुक्यातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वीज समस्या गंभीर झाली आहे. परिणामी कृषी पर्यटन, महाविद्यालये, व्यवसाय या सर्वांना त्याचा फटका बसतो आहे. त्यामुळे या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी होते आहे.
मुंबई, उपनगरातील घरे परडवत नसल्याने गेल्या काही वर्षात अंबरनाथ, बदलापूर शहरांकडे चाकरमानी वळला. त्यामुळे या शहरांसह या शहरांच्या ग्रामीण भागातही झपाट्याने नागरीकरण होऊ लागले. बदलापूर शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या वांगणी गावाचे वेगाने नागरीकरण होते आहे. तर उल्हास नदीमुळे या नदीलगत अनेक कृषी पर्यटन, शेत घरे, रिसॉर्ट आणि हॉटेल्स सुरू झाल्या आहेत. याची एक वेगळी अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. सोबतच या परिसरात अभियांत्रिकी महाविद्यालये, विद्यालयेही सुरू झाली आहेत. त्यामुळे गावांचा चेहरामोहरा बदलू लागला आहे. उल्हास नदी आणि बारवी नदीच्या प्रवाहामुळे येथे शेतकरीही बारमाही शेती करताना पहायला मिळतात. या भागात स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव अनेक रस्त्यांचे कॉंक्रिटीकरणही पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे हा भाग विकसीत वाटू लागला आहे. असे असले तरी येथील महावितरणाचा कारभार या सर्व व्यवस्थेला त्रासदायक ठरू लागला आहे.
सातत्याने खंडीत होणारा वीज पुरवठा ही या ग्रामीण भागातील सर्वात मोठी समस्या बनली आहे. येथे पायाभूत सुविधा उभारण्यात येत असल्या तरी येथील वीज पुरवठा यंत्रणा मात्र जुनाट आहे. त्यामुळे एखाद्या वेळी यंत्रणेत बिघाड झाल्यास तो दुरूस्त होण्यास मोठा वेळ जातो. तितका वेळ विजेविना काढावा लागतो. त्याचा विविध ठिकाणी फटका बसतो. पर्यटकांना अविरत विज पुरवठा करण्यास कृषी पर्यटन केंद्र, शेतघर मालकांना अवघडे होते. त्यामुळे ग्राहकांची नाराजी ओढावून घ्यावी लागते. विजेच्या मागणीत वाढ झाली असली तरी तितका पुरवठा महावितरणाकडून होत नाही. परिणामी वीज पुरवठा यंत्रणेवर ताण येऊन ती ठप्प होते. या सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मागणी केली जाते, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होतो आहे.
हेही वाचा : मत्सपालन व्यवसायात गुंतवणुक करण्याच्या आमिषाने कोट्यावधींची फसवणूक
महाविद्यालये, वसाहती वाढल्या
वांगणी आणि आसपासच्या ग्रामीण भागात नव्याने अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू झाली आहेत. अनेक नव्या गृहसंकुलांच्या वसाहतीही सुरू झाल्या असून यांना खंडीत होणाऱ्या विजपुरवठ्यामुळे त्रास सहन करावा लागतो. या भागात अनेक नवे गृहप्रकल्प प्रस्तावित असून त्यासाठी महाविरणाने नियोजन करण्याची गरज आहे.
वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वाढले आहेत. यंत्रणा सक्षमीकरणासाठी कित्येक वर्ष सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही. यंत्रणा सुधारत नसताना बिले मात्र वाढत आहेत. – दिलीप देशमुख, संचालक, देशमुख फार्म, कृषी पर्यटन.