पाच दिवसापूर्वी शहापूर तालुक्यातील (जि. ठाणे) साकडबाव, कोठारे भागात संचार करणाऱ्या बिबट्याने वासरू, शेळी फस्त केल्या नंतर भातसा धरण जंगलातून कसारा दिशेने कूच केली आहे. बिबट्याने कसारा भागातील राड्याचा पाडा येथे सोमवारी संध्याकाळी एका शेतकऱ्यावर हल्ला केला. बिबट्याने पाठमोरा हल्ला करताच शेतकऱ्याने ओरडा करत हातामधील काठीने बिबट्याच्या दिशेने आक्रमक प्रतिकार केला. या झटापटीत बिबट्याने पळ काढला.
हेही वाचा >>>‘भारत जोडो यात्रे’ला महाराष्ट्राचा निरोप, मध्यप्रदेशात स्वागत; उत्कृष्ट संयोजनाबद्दल राज्याला ‘ए प्लस’ मानांकन
साकडबाव जंगलात पाच दिवसांपासून बिबट्याने मुक्काम ठोकला होता. कोठारे आदिवासी पाड्यातील एका शेतकऱ्याचे जंगलात चरायला गेलेले वासरू बिबट्याने फस्त केले होते. एका शेतकऱ्याची शेळी गायब होती. बिबट्याचा संचार साकडबाव हद्दीत असल्याचे समजताच वन विभागाने या भागात गस्त वाढविली होती. सोमवारी बिबट्याने आपला मार्ग बदलून भातसा धरण जंगलातून त्याने कसारा, तानसा अभयारण्य दिशेचा रस्ता धरला.
कसारा जवळील राड्याचा पाडा येथील मंगेश मोरे हा तरुण शेतकरी जंगल भागात माळरानावरील वरईचे पीक काढण्यासाठी गेला होता. वरईचा भारा घेऊन घरी येत असताना एका झुडपाच्या आडोशाला बसलेल्या बिबट्याने अचानक मंगेशच्या पाठीमागून हल्ला केला. पाठीमागे वळून पाहताच बिबट्याला पाहून मंगेश घाबरला. काही क्षणात मंगेशने डोक्यावरील वरईचा भारा जमिनीवर फेकून हाता मधील काठी बिबट्याच्या दिशेने फिरवत आणि जोराने ओरडा करत आक्रमक प्रतिकार केला. या झटापटीत सावज टप्प्यात न आल्याने आणि पकड सुटल्याने बिबट्याने पळ काढला. मंगेशने काही क्षणात जंगलातून पळ काढत घर गाठले. जंगलात बिबट्या आल्याची वार्ता गावभर पसरली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती देण्यात आली.
हेही वाचा >>>वाघाच्या डरकाळ्यांमुळे गोंदियातील नवेझरीत अघोषित संचारबंदी; ग्रामस्थांमध्ये दहशत
मंगेशच्या अंगावर पाठीमागून बिबट्याने झडप घातली. त्याच्या पाठीवर बिबट्याच्या नखांचे ओरखडे उमटले आहेत. मंगेशने दवाखान्यात जाऊन उपचार करुन घेतले.ठाणे जिल्ह्याच्या जंगल भागात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी. जंगलात जाताना समुहाने जावे. वन विभागाने जागोजागी फलकांवर दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.