एकीकडे स्वाईन फ्ल्यू चा धोका तर, दुसरीकडे वातावरण बदलामुळे साथीच्या आजारानेही डोके वर काढल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, पोटदुखी या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. आठवड्याभरापासून जिल्ह्यातील छोट्या खासगी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही दुप्पटीने वाढ झाल्याची माहिती ठाण्यातील एका खासगी डॉक्टरांकडून देण्यात आली.
करोना प्रादूर्भाव ओसरल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. परंतू, गेल्या काही दिवसांपासून स्वाईन फ्ल्यू चा धोका वाढल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीला स्वाईन फ्ल्यूच्या १८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ठाणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. अचानक झालेल्या या वाातावरण बदलामुळे जिल्ह्यात साथीच्या आजारांचा फैलाव वाढला आहे. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, पोटदुखी, थकवा या आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे ते त्यांच्या घराजवळील दवाखान्यात गर्दी करु लागले आहेत. स्वाईन फ्ल्यूचेही लक्षणेही सारखीच आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आठवड्याभरापासून जिल्ह्यातील छोट्या दवाखान्यात साथीचे आजार असलेल्या रुग्णांमध्ये दुप्पटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या दवाखान्यांमध्ये महिनाभरापूर्वी दररोज केवळ ५० ते ८० रुग्ण उपचारासाठी येत होते, परंतू, मागील आठवड्याभरापासून दररोज १०० ते १५० रुग्ण उपचारासाठी येत आहेत, अशी माहिती ठाण्यातील एका खासगी डॉक्टरांकडून देण्यात आली. यामध्ये सर्वाधिक प्रमाण ताप, सर्दी आणि खोकला असणाऱ्या रुग्णांचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्वाईन फ्ल्यूमुळे नागरिकांमध्ये संभ्रम
एकीकडे स्वाईन फ्ल्यूचा धोका आणि दुसरीकडे पसरत असलेल्या साथीच्या आजारामुळे नागरिक हैराण झाले आहे. ताप येणे, सर्दी, खोकला, अंगदुखी अशीच स्वाईन फ्ल्यूची लक्षणे असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतू, एखाद्या रुग्णास सतत तीन ते चार दिवस हा त्रास होत असेल तरचं त्या रुग्णास स्वाईन फ्ल्यूची चाचणी करण्याचा सल्ला दिला जात आहे, असे खासगी डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
प्रतिक्रिया
वातावरणात झालेल्या बदलामुळे साथीच्या आजारात वाढ झाली आहे. या कालावधीत नागरिकांनी बाहेरील खाद्यपदार्थाचे सेवण करणे टाळावे तसेच दररोज गरम पाणी पिणे गरजेचे आहे.-डॉ. नंदकुमार ठाकूर, कोपरी.