कल्याण – कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांचा प्रश्न कायमचा निकाली निघण्यासाठी फेरीवाला हटाव पथकातील अनेक कामगारांच्या आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी बदल्या केल्या. बदल्या करूनही काही कामगार फेरीवाल्यांना हटविण्यापेक्षा आपले आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी त्यांची पाठराखण करत आहेत. या प्रकारामुळे कल्याण पश्चिमेतील क प्रभाग, डोंबिवली पूर्व भागातील फ प्रभागातील फेरीवाल्यांचा प्रश्न कायम आहे.
डोंबिवली पूर्वेतील ग प्रभाग क्षेत्र, पश्चिमेतील ह प्रभाग, कल्याण पूर्व भागातील ड, टिटवाळा पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले हटविण्यात तेथील अधिकारी यशस्वी झाले आहेत. डोंबिवली पूर्व फ प्रभाग, कल्याण पश्चिमेतील क प्रभाग हद्दीतील फेरीवाले हटविण्यात अधिकाऱ्यांना कोणत्या अडचणी येत आहेत, असे प्रश्न नागरिक करत आहेत.
रेल्वे स्थानक भागातील रस्ते, पदपथ फेरीवाल्यांनी व्यापून टाकल्याने पादचाऱ्यांना रेल्वे स्थानक भागातून चालणे अवघड होते. रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. रस्ते, पदपथावर एकही फेरीवाला दिसता कामा नये अशी तंबी दोन महिन्यांपूर्वी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी फेरीवाला हटाव पथकांना दिली होती.
डोंबिवलीत बाजार
मागील अनेक वर्षे डोंबिवली पूर्वेत दर सोमवारी रेल्वे स्थानक भागात फेरीवाल्यांचा बाजार भरतो. या बाजारामुळे रेल्वे स्थानक परिसर वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकतो. काल फ प्रभाग हद्दीतील रेल्व स्थानक ते मानपाडा रस्त्यावरील कस्तुरी प्लाझापर्यंत फेरीवाले, रस्ते, पदपथ अडवून व्यवसाय करत होते. मानपाडा रस्ता फेरीवाल्यांमुळे कोंडीत अडकला होता. फ प्रभागात फेरीवाल्यांचा बाजार भरला असताना त्याच्या लगत असलेल्या ग प्रभाग हद्दीत एकही फेरीवाला बसणार नाही याची काळजी ग प्रभाग फेरीवाला हटाव पथकाने घेतली होती. फ प्रभाग फेरीवाला हटाव पथकातील काही कामगार फेरीवाल्यांची हप्ता वसुलीसाठी पाठराखण करत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
सोमवारी संध्याकाळी पाच ते रात्री १० वाजेपर्यंत फेरीवाले फ प्रभाग हद्दीतील रस्ते, पदपथावर बसले होते. एका जागरुक नागरिकाने फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भरत पाटील यांना फेरीवाल्यांची माहिती दिल्यावर इतरत्र कारवाईसाठी गेलेले पथक तात्काळ घटनास्थळी येऊन त्यांनी फेरीवाल्यांना हटविले. हटविलेले फेरीवाले लगतच्या गल्ली बोळात जाऊन व्यवसाय करत होते. अर्ध्या तासानंतर हेच फेरीवाले पुन्हा मुख्य रस्त्यावर येऊन व्यवसाय करत होते. या घटनेची माहिती एका जागरुक नागरिकाने उपायुक्त स्वाती देशपांडे यांना छायाचित्रासह दिली.
कल्याण पश्चिमेला विळखा
कल्याण पश्चिम क प्रभाग हद्दीतील रेल्वे स्थानक, खडकपाडा, बाजारपेठ, मोहल्ला विभागात एकही फेरीवाला बसणार नाही असे नियोजन तत्कालीन साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांनी केले होते. मागील आठ महिने कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागातील रस्ते मोकळे होते. कुमावत यांचा सरळमार्गी कारभार पालिका मुख्यालयातील एका उपायुक्ताला ‘अडथळा’ ठरत होता. कुमावत यांची क प्रभागातून बदली करून तेथे ‘सोयी’चा अधिकारी संबंधित अधिकाऱ्याने बसविला. या नवख्या अधिकाऱ्याला फेरीवाला हटाव पथकातील ‘मुरब्बी’ कामगार दाद देत नसल्याने कल्याण पश्चिमेला पुन्हा फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. फेरीवाल्यांमुळे दररोज रेल्वे स्थानक भागात वाहतूक कोंडी होते, असा प्रवाशांच्या तक्रारी आहेत.
सरळमार्गी कर्मचारी अडगळीत
फेरीवाल्यांना हटविण्यात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावणारे बाजीराव आहेर, रांजेंद्र साळुंखे, संजयकुमार कुमावत हे कर्मचारी काही अधिकारी, कामगारांना अडथळा ठरत असल्याने त्यांना विभाग प्रमुखांनी मुख्य प्रवाहातून बाजुला काढले आहे. अहेर यांना खडेगोळवली, कुमावत यांना मालमत्ता, साळुंखे यांना जनगणना विभागात पाठविण्यात आले आहे.
“कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात नियमित फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे. रस्ते मोकळे राहितील याची दक्षता घेत आहोत.” असे कल्याण, क प्रभाग, साहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे म्हणाले.
“फेरीवाले हटाव पथक फलक, अतिक्रमण तोडणे या कारवाईसाठी गेले की त्या कालावधीत फेरीवाले रस्त्यावर बसतात. कामगार संख्या कमी आहे. तरीही नियमित फेरीवाले हटविले जातात.” असे डोंबिवली, फ प्रभाग, साहाय्यक आयुक्त, भरत पाटील म्हणाले.