उल्हासनगरः उल्हास नदीत वाढलेल्या जलपर्णीचे प्रमाण वाढल्याने मोहने येथील पाणी पुरवठा केंद्रावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. परिणामी सोमवारी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने उल्हास नदीतील पाणी उदंचन केंद्राला विळखा घालणाऱ्या जलपर्णीला हटवण्यास सुरूवात झाली. यंत्रणा उपलब्ध नसल्याने हातानेच जलपर्णी काढली जात होती. येत्या काही दिवसात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या वतीने येथे यंत्रे उपलब्ध करून जलपर्णी काढली जाणार आहे.
नागरी आणि औद्योगिक सांडपाण्याचा विसर्ग उल्हास नदीच्या पात्रात होत असल्याने गेल्या काही वर्षात उल्हास नदीतील प्रदुषण वाढले आहे. परिणामी उल्हास नदीत जलपर्णी निर्माण होण्याचे प्रमाणही वाढले आहे. या जलपर्णीमुळे जलचर धोक्यात आले आहेत. त्यातच ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांना पाणी पुरवठा करण्यासाठी उल्हास नदी महत्वाची आहे. आधीच वाढती लोकसंख्या आणि मागणी पाणी यामुळे पाण्याचे व्यवस्थापन बिघडत असताना आता जलपर्णीमुळे पाणी पातळी घटते आहे. त्यामुळे जलपर्णी काढण्यासाठी उल्हास नदीत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून यंत्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मात्र त्यापूर्वी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या मोहोने आणि मोहिली या जलशुद्धीकरण प्रकल्पांतील उदंचन केंद्राला जलपर्णीचा विळखा पडला आहे.
त्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती आहे. जलपर्णीमुळे पाणी उचलण्यात अडचणी येत असल्याने कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात जलपर्णी बाजुला काढण्याचे काम सुरू केले आहे. सोमवारी पालिकेच्या वतीने काही कर्मचारी मोहने येथील बंधाऱ्यावर उभे राहून जलपर्णी बाजुला सारत होते, अशी माहिती पर्यावरण कार्यकर्ते शशिकांत दायमा यांनी दिली आहे. ही जलपर्णी पाणी प्रक्रिया यंत्रांमध्ये जाण्याची भीती असते. त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पालिका प्रशासनाने जलपर्णी हटवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
सांडपाणी नदी मिसळणे सुरूच
उल्हास नदीत बारवी धरणातून पाणी सोडले जाते. ते अंबरनाथच्या जांभूळ येथे आपटी बंधाऱ्याजवळ उचलून त्यावर प्रक्रिया केली जाते. मोहिली आणि मोहोने येथेही पाणी उचलले जाते. त्यापूर्वी बदलापुरात पाणी उचल केली जाते. या सर्व भागात सांडपाणी नदीत मिसळणेही सुरूच आहे. ग्रामीण भागात नागरिकरण वेगाने होते आहे. त्याच्या सांडपाण्याची व्यवस्था अद्याप झालेली नाही. मात्र नदी प्रदुषण मात्र या सर्वात वाढतेच आहे.
जलपर्णी हटवणाऱ्या यंत्रांची प्रतिक्षा
दोन आठवड्यापूर्वी झालेल्या बैठकीत नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिम गुप्ता यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ जलपर्णी हटवण्यासाठी तात्काळ १५ दिवसात यंत्रे उपलब्ध करून देईल असे निश्चित करण्यात आले आहे. हा कालावधी येत्या चार दिवसात पूर्ण होईल. त्यामुळे वेगाने जलपर्णी हटवण्यासाठी या यंत्रांकडे पालिका प्रशासन आणि पर्यावरणप्रेमींचे डोळे लागले आहेत.