बदलापूरः बदलापूर शहराच्या एकमेव उड्डाणपुलावर आणि पुलाच्या प्रवेशद्वारावर सालाबादाप्रमाणे यंदाही खड्डे पडले आहेत. कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या मुख्यालयाशेजारी पालिकेचे कै. दुबे रूग्णालय असून रूग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच मोठा खड्डा दरवर्षी पडतो. या खड्ड्यामुळे येथे वाहतूक कोंडी होत असून पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या वतीने येथे ‘पालिकेचा लाडका खड्डा’ असा बॅनर लावण्यात आला आहे. हा लाडक्या खड्ड्याचा बॅनर सध्या शहरवासियांचे लक्ष वेधतो आहे.
बदलापूर शहरातील एकमेव उड्डाणपूल शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. शहरातल्या पूर्व पश्चिम भागात येजा करण्यासाठी हा उड्डाणपुल महत्वाचा आहे. शहराच्या बेलवली भागात भुयारी मार्ग असला तरी तो अरूंद असल्याने येथे वारंवार वाहतूक कोंडी होते. त्यामुळे नागरिक याच उड्डाणपुलावर जाणे पसंत करतात. दरवर्षी शहरातल्या या एकमेव उड्डाणपुलावर खड्डे पडतात. या खड्ड्यांमुळे येथून होणारी वाहतूक संथगतीने होते. त्यामुळे शहराच्या पश्चिम भागात थेट दत्त चौकापर्यंत वाहनांचा लांबच लांब रांगा लागतात. तर पूर्वेला कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्यालय, पालिकेचे कै. दुबे रूग्णालय आहे. येथे शहरातून मोठ्या संख्येने नागरिक पालिकेत कामासाठी तर रूग्णालयात रूग्ण येत असतात. त्यामुळे त्यांची वाहने येथेच असतात. या भागात शहरातील सर्वात मोठी आदर्श विद्या मंदिर आणि महाविद्यालय आहे. याच भागातून कात्रप आणि स्थानक परिसरात जाण्यासाठी वाहने वळतात. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी झाल्यास त्याचा संपूर्ण शहराच्या वाहतुकीवर परिणाम होतो. याच भागात दरवर्षी मोठा खड्डा पडतो. उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारावरच दरवर्षी खड्डा पडल्याने येथे मोठी कोंडी होते. पालिका प्रशासन दरवर्षी खड्डे बजवण्याचा प्रयत्न करते.
हेही वाचा >>>मुसळधार पावसामुळे टिटवाळाजवळील रूंंदे पूल पाण्याखाली; १२ गावांचा संपर्क तुटला
मात्र काही तासातच तो खड्डा पुन्हा उगवतो. मंगळवारी पालिका प्रशासनाने याच खड्ड्याला बुजवण्याचा प्रयत्न केला. बुधवारी हाच खड्डा पुन्हा जैसे थे अवस्थेत होता. त्यामुळे पालिकेच्या या खड्डे बुजवण्याच्या तंत्रावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे. चक्क पालिका मुख्यालयाच्या समोरच हा खड्डा दरवर्षी पडूनही यावर ठोस उपाययोजना होत नसल्याने आता राजकीय पक्ष पालिकेच्या कार्यपद्धतीवर टीका करत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी येथे पालिकेचा लाडका खड्डा अशा आशयाचा बॅनर लावला आहे. हा बॅनर सध्या बदलापुरकरांचे लक्ष वेधतो आहे. त्या मोठ्या खड्ड्याचा फोटोही यात लावण्यात आला आहे. वाहने सावकाश चालवा, पालिकेचा लाडका खड्डा येथे आहे असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. पालिका मुख्यालयाशेजारी लावलेला हा बॅनर आता चर्चेचा विषय ठरतो आहे.