लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे: रेल्वे पोलिसांच्या दक्षतेमुळे केवळ पाऊण तासात लोकलमध्ये गहाळ झालेली लॅपटॉपची बॅग प्रवाशाला मिळाली आहे. अंबरनाथहून सकाळी ठाण्याच्या दिशेने प्रवास करणारे प्रवासी किरण यादव हे त्यांची लॅपटॉप आणि काही महत्वाचे साहित्य असणारे बॅग लोकलमध्ये विसरले. बॅग रेल्वे गाडीतच विसरल्याचे त्यांचे ठाणे स्थानकात लक्षात येताच त्यांनी १५१२ या क्रमांकावर रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. रेल्वे पोलिसांनी संपूर्ण यंत्रणा कामाला लावत मस्जिद बंदर स्थानकातून बॅग लोकल मधून ताब्यात घेऊन यादव यांच्या स्वाधीन केली.
अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागात किरण यादव राहता. आज सकाळी नेहमीप्रमाणे किरण यांनी अंबरनाथ येथून १०.३५ ची बदलापूर – सीएसएमटी लोकल गाडीने प्रवास सुरु केला. मात्र ठाणे स्थानकात उतरल्यावर त्यांची बॅग गाडीतच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र तो पर्यंत गाडी निघून गेली असल्याने त्यांना बॅग घेणे शक्य झाले नाही. यानंतर त्यांनी लागलीच १५१२ या रेल्वे पोलिसांच्या मदत क्रमांकावर संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. यानंतर ठाणे रेल्वे पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक पंढरी कांदे आणि मुंबई रेल्वे पोलीस दलाचे निरीक्षक विजय तायडे यांनी रेल्वे पोलिसांना सूचना देत संबंधित लोकलची तपासणी करण्याचे आदेश दिले.
हेही वाचा… कल्याण: नालंदा विद्यालयातील शिक्षिकेने केली बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक
यावेळी पोलिसांनी मस्जिद बंदर येथे लोकल मधून बॅग ताब्यात घेतली. यानंतर किरण यादव यांना मस्जिद बंदर येथील रेल्वे पोलीस स्थानकात बॅग स्वाधीन केली. बॅग मध्ये सुमारे ४० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप आणि इतर काही महत्वाचे साहित्य होते. केवळ पाऊण तासाच्या कालावधीत बॅग मिळाल्याने किरण यांनी पोलिसांचे आभार मानले.