डोंबिवली – डोंबिवलीतील फडके रोडवर अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने फडके रोडची शुक्रवारी सकाळी टँकरद्वारे पाणी मारून सफाई करण्यात आली.तसेच या रस्त्यावरील फेरीवाल्यांचे पक्क्या बांधकामाचे मंच जेसीबीच्या साह्याने तोडून टाकण्यात आले.
फडके रोडवर सकाळीच टँकर मधून पाणी मारून स्वच्छता केली जात असताना नागरिक, व्यापारी आश्चर्यचकित होऊन पाहत होते. शहराच्या अनेक भागात नागरिकांना पिण्यास पाणी नाही, मात्र फडके रोडवर पाण्याची उधळपट्टी चालल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. अयोध्येतील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दूरदृश्य प्रणाली दारे फडके रोडवरील आप्पा दातार चौकात नागरिकांना दाखवण्यात येणार आहे. यानिमित्ताने या रस्त्यावर स्वच्छता असावी या उद्देशाने ही सफाई करण्यात आली आहे. श्री गणेश मंदिरा संस्थानच्या पुढाकाराने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
हेही वाचा >>>डोंबिवली: काटई येथे जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया
तसेच पालिकेच्या फ प्रभागाकडून फडके रस्ता, चिमणी गल्ली, नेहरू रस्ता भागात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.अशाच प्रकारे पालिका अधिकाऱ्यांनी नियमित फडके रस्ता, चिमणी गल्ली, नेहरू रस्ता भागातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फडके रोडवरील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन या रस्त्यावर स्वच्छता केली असल्याची समजते.