लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: मुंबई-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस पकडताना कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांची तारांबळ उडते. कल्याण रेल्वे स्थानकात आपण प्रवास करणारा डबा फलाटावर कोणत्या ठिकाणी येणार आहे याची माहिती प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या संकेतस्थळावरुन घेतलेली असते. फलाटावर आल्यावर तो डबा अन्य ठिकाणी उभा राहणार असल्याचे दाखविले जाते. रेल्वे प्रशासनातील या समन्वयाच्या अभावामुळे सकाळच्या वेळेत इंद्रायणी एक्सप्रेस पकडताना प्रवाशांना धावपळ करावी लागते, अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत.
मुंबई-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस सकाळी ६.३३ वाजता कल्याण रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक चारवर येते. ही एक्सप्रेस उभी राहणाऱ्या फलाटावर रेल्वेकडून विविध प्रकारची कामे सुरू आहेत. आटोपशीर जागेतून प्रवाशांना येजा करावी लागते. कल्याण रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक चारवर गेल्यावर धावपळ नको म्हणून प्रवासी घरबसल्या रेल्वेच्या संकेतस्थळावरुन इंद्रायणी एक्सप्रेसचे डबे कोणत्या ठिकाणी उभे राहणार आहेत याची माहिती घेतात. त्याप्रमाणे फलाटावर येऊन आपल्या ठिकाणी उभे राहतात. फलाटावरील दर्शक यंत्रणेत व संकेतस्थळावर दाखविलेल्या डब्याच्या विपरित ठिकाणी संबंधित ठिकाणी उभा राहणार असल्याचे दाखवलेले असते. संकेतस्थळावरील माहिती विश्वासर्ह की दर्शकावरील माहिती खरी या गोंधळात प्रवाशांना हातामधील पिशव्या, लहान मुले असा जामानिमा घेऊन फलाटावर एका टोकाकडून दुसऱ्या टोकाला पळावे लागते. हा प्रकार नेहमीचा झाला आहे, असे प्रवासी सांगतात.
आणखी वाचा- कल्याणमध्ये बदलीच्या ठिकाणी हजर न होणाऱ्या सफाई कामगारांना नोटिसा, साहाय्यक आयुक्तालाही नोटीस
यापूर्वी फलाटावर एक्सप्रेसचा डबा कोणत्या ठिकाणी उभा राहणार आहे याचे क्रमांक फलाटावर दर्शक यंत्रणेवर दाखविलेले जात होते. डोंबिवलीतील पर्यटन कंपनीच्या संचालिका शोभना साठे बुधवारी सकाळी इंद्रायणी एक्सप्रेसने पुण्याला चालल्या होत्या. कल्याण रेल्वे स्थानकातून त्या प्रवास सुरू करणार होत्या. कल्याण रेल्वे स्थानकात गेल्यावर धावपळ नको म्हणून त्यांनी घरबसल्या मध्य रेल्वेच्या संकेतस्थळावर आपण प्रवास करणारा डबा स्थानकात कोणत्या ठिकाणी येतो याची तपासणी केली. त्यांना डबा दहाव्या अनुक्रमांकावर थांबत असल्याचे दिसले. कल्याण स्थानकात आल्यावर त्यांनी स्थानकातील दर्शक यंत्रणेवर पाहिले तर त्यांचा डबा इंजिनला लागून पहिला असल्याचे दिसले. आपण संकेतस्थळावरील की दर्शक यंत्रणेवरील अनुक्रमांक निश्चित करायचा. नक्की एक्सप्रेसचा डबा फलाटावर कोणत्या ठिकाणी येणार या विचारात असताना इंद्रायणी एक्सप्रेस कल्याण स्थानकात आली. त्यावेळी त्यांचा डबा अनुक्रमांक पाचव्या ठिकाणी आला. इंजिनच्या ठिकाणी उभ्या असलेल्या साठे धावपळ करत गर्दीतून वाट काढत पाचव्या डब्याच्या ठिकाणी पोहचल्या. असाच अनुभव इतर प्रवाशांनाही आला, असे साठे यांनी सांगतले.
आणखी वाचा- ठाणे पालिकेच्या लघुलेखकांच्या वेतनश्रेणीत वाढ, शासनाप्रमाणे वेतनश्रेणी लागू
आता सुट्टीचे दिवस आहेत. लोक गावी, फिरण्यासाठी कुटुंबासह बाहेर पडत आहेत. प्रवाशांना प्रवास करताना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
“फलाटावरील प्रवाशांची तारांबळ थांबविण्यासाठी रेल्वेने संकेतस्थळावरील एक्सप्रेस डब्यांचे अनुक्रमांक योग्य द्यावेत. फलाटावरील दर्शक यंत्रणेत वेगळा क्रमांक, संकेतस्थळावर अन्य क्रमांक यामुळे प्रवाशांची धावपळ होते. यामध्ये ज्येष्ठ, वृध्दांचे हाल होतात.” -शोभना साठे, प्रवासी, डोंबिवली.