कल्याण – मागील काही दिवसांपासून कल्याण, डोंबिवलीत वर्दळीच्या रस्त्यांवर डम्पर चालक भरधाव वेगाने, निष्काळजीपणे डम्पर चालवून अपघात घडवून आणत आहेत. या डम्पर चालकांच्या वर्दळीच्या रस्त्यांवरील सुसाटपणाला वाहतूक, आरटीओ विभागाने आवर घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
गेल्या आठवड्यात डोंबिवलीत डाॅ. राजेंद्र प्रसाद रस्त्यावर एका बांधकाम कंपनीच्या डम्पर चालकाने निष्काळजीपणे डम्पर चालविल्याने एका ५५ वर्षांच्या पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला होता. दोन महिन्यांपूर्वी दत्तनगर भागात असाच प्रकार घडला होता. कल्याण, डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणात अधिकृत, बेकायदा बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांसाठी सिमेंट, मिक्सर घेऊन येणारे डम्पर चालक शहराच्या मध्यवर्ति रस्त्यांवर गर्दीचा विचार न करता भरधाव वेगाने डम्पर चालवित आहेत. त्यामुळे अपघात घडत आहेत. हे प्रकार यापूर्वी झाले असताना सोमवारी सकाळी कल्याण पूर्वेतील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर विजयनगर भागात एका डम्पर चालकाचे डम्परवरील नियंत्रण सुटले. चालकाने कौशल्याने डम्पर रस्ता दुभाजकाला धडकवला. अन्यथा मोठी दुर्घटना या भागात घडली असती, असे विजयनगर भागातील व्यापाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा – ठाण्यातील सेवा रस्त्यांवर वाहनतळाची सुविधा सुरू
डम्पर चालकाने डम्पर रस्ता दुभाजकाला धडकवताच मोठा आवाज या भागात घडला. सुदैवाने या ट्रकच्या मागेपुढे वाहने नव्हती. अन्यथा वाहने एकमेकांवर आदळली असते, असे पादचाऱ्यांनी सांगितले. कल्याण, डोंबिवली शहर परिसरात सुसाट वेगाने डम्पर चालविणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक पोलीस, आरटीओ अधिकाऱ्यांनी पहिले समज देणारी सूचना करावी. जे चालक ऐकणार नाहीत त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.