आधारवाडीतील आगीमुळे किल्ल्यावरील वृक्षही मरणासन्न

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे मुख्य केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात असलेल्या सदाहरित वृक्षांना आधारवाडीच्या आगीच्या झळांचा फटका बसला आहे. या कचराभूमीतून सतत उठणाऱ्या आगीच्या ज्वाला आणि धुरामुळे या किल्ल्यावरील अनेक वृक्ष निष्पर्ण झाली असून काही तर मृतप्राय झाल्याने वृक्षप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. किल्ल्यावरील हिरवळीला पहिल्यांदाच इतका मोठा फटका बसल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे असून या प्रश्नावर काही रहिवासी पर्यावरण विभागाकडे तक्रार नोंदविण्याची तयारी करीत आहेत.

ऐतिहासिक शहर म्हणवल्या जाणाऱ्या कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ला वगळता ऐतिहासिक वास्तूंच्या कोणत्याच खुणा आता शिल्लक राहिलेल्या नाहीत. किल्ल्यावरील दुर्गाडी देवीच्या मंदिरामुळे यास धार्मिक महत्त्व असले तरी येथील वृक्षराजीमुळे कल्याण शहरात प्रवेश करताना हिरवागार अनुभव मिळतो. भिवंडीकडून कल्याणमध्ये प्रवेश करताना अथवा रेल्वेतून कल्याणच्या दिशेने येताना लांबून दुर्गाडीची हिरवळ अनेकांना खुणावत राहते. यंदा मात्र दुगाडीचा डोंगर ओकाबोका दिसू लागला असून काही तज्ज्ञांच्या मते आधारवाडीच्या धुराचा आणि आगीचा हा परिणाम आहे. संपूर्ण किल्ल्यावरील वृक्ष निष्पर्ण झाले आहेत. तर काही झाडांची पाने झाडावरच सुकून गेल्याचे चित्र दिसून येत आहे. आधारवाडी कचराभूमीला वारंवार लागणाऱ्या आगीमुळे हा प्रकार घडत असल्याची शक्यता स्थानिक रहिवाशी महेंद्र जोशी यांनी व्यक्त केली आहे.

ज्वालांमुळे पानगळ

फाल्गुन महिन्यामध्ये पाणगळ झाल्यानंतर चैत्रामध्ये वृक्षांना नवी पालवी फुटते, असे चित्र असले तरी दुर्गाडीच्या वृक्षांना अजूनही पालवी फुटल्याचे दिसून येत नाही. उलट वृक्षावरील पालवी सुकल्याचे दिसून येते. एक महिन्यापासून सुरू असलेल्या कचराभूमीवरील आगीच्या घटनांमुळे धुराचे लोट संपूर्ण शहरभर पसरले होते. त्याचा फटका संपूर्ण शहराला बसला असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. तशीच परिस्थिती झाडांवर ओढवली आहे.

कचराभूमीच्या दरुगधीमधून क्षणभर का होईना स्वच्छ श्वास घेण्यासाठी येथील लोक दुर्गाडी किल्ल्यावर जायचे. तेथील हिरवळ, टुमदार झाडांमध्ये काही वेळ काढायचे. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये हा सर्व परिसर रखरखीत झाला आहे. झाडावर एकही पान शिल्लक राहिले नाही.

सोनल जगताप, आधारवाडी रहिवासी

कचराभूमीला लागणाऱ्या आगीचा परिणाम जसा व्यक्तींवर, प्राण्यांवर होतो तसा तो झाडांवरही होऊ शकतो.  ती झाडे कोणत्या प्रजातीची आहेत, त्यांच्या क्षमता पडताळण्याची गरज आहे. कचऱ्यापासून निघणाऱ्या धुराचा त्वरित परिणाम झाडांवर दिसून येत नसला तरी कालांतराने परिणाम होणार हे निश्चित आहे.

विद्याधर वालावलकर, पर्यावरणतज्ज्ञ