कल्याण : येथील कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या दिशेने शनिवारी दुपारी न्यायालयीन कामकाज सुरू असताना कटघऱ्यामधील आरोपीने किरकोळ कारणावरून पायातील चप्पल भिरकावली. या घटनेने काही वेळ न्यायालयात गोंधळ उडाला. सरकारी कामात आणि पोलिसांच्या कर्तव्यात अडथळा आणला म्हणून आरोपी विरुध्द महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
किरण संतोष भरम (२२) असे चप्पल भिरकावणाऱ्या इसमाचे नाव आहे. दाखल गुन्ह्यातील माहिती अशी, की खडकपाडा पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील इसम किरण भरम यांना शनिवारी दुपारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश आर. जी. वाघमारे यांच्या समोर दिलेल्या तारखेप्रमाणे पोलिसांनी हजर केले होते. इसम किरण यांनी न्यायालयाला टेबल बदल करण्याची मागणी केली. न्यायालयाने किरण यांना तुम्ही तुमच्या वकिलामार्फत तसा अर्ज द्या, असे सांगितले. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी न्यायालयीन सेवकाने इसमाच्या वकिलाच्या नावाचा पुकारा करून हजर राहण्याचे सूचित केले. इसमाचा वकील न्यायालयात हजर झाला नाही. न्यायालयाने इसमास दुसरा वकील देण्याची सूचना केली आणि याप्रकरणी पुढील तारीख दिली.
यावेळी इसमाने खाली वाकून पायातील चप्पल काढली. ती न्यायाधिश वाघमारे यांच्या दिशेने फेकली. पोलीस किंवा न्यायालयीन कर्मचाऱ्यांना कळण्यापूर्वीच इसमाने ही कृती केली. चप्पल न्यायाधिशांच्या समोरील लाकडी मंचकाला लागून बाजुला बसलेल्या कर्मचाऱ्याच्या समोर पडली. ही माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्यात देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस नियंत्रण कक्षातील उपनिरीक्षक अरूण कोकीतकर यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यात किरण यांच्या विरुध्द शासकीय कामात अडथळा आणि पोलिसांना शासकीय कर्तव्य करण्यापासून परावृत्त केल्याचा गु्न्हा दाखल केला. साहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील तपास करत आहेत.
काय आहे प्रकरण
कल्याण पश्चिमेतील मिलिंदनगर भागात राहणाऱ्या सुजित पाटील या तरूणाची चार वर्षापूर्वी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात खडकपाडा पोलिसांनी संशयित किरण भरम यांना अटक केली आहे. सुजीत आणि किरण हे एकाच परिसरात राहत होते. त्यांच्यात काही वाद होता. या वादातून संशयित किरण याने आपल्या साथीदारांसह सुजितवर कोयत्याने वार करून त्याची हत्या केल्याचा वहिम आहे. या गुन्ह्यामुळे किरण आधारवाडी कारागृहात आहे.
न्यायालयात आता न्यायाधीश, वकील सुरक्षित नाहीत. त्यामुळे शासनाने वकील संरक्षण कायदा मंजूर करून त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी. न्यायधिशांच्या दिशेने चप्पल भिरकावली जात असेल तर पोलीस काय करत होते. अशा पोलिसांवर कारवाई करावी. ॲड. प्रकाश जगताप अध्यक्ष, कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटना.